कळंब – वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले कायदेशीर प्रश्न तात्काळ सोडविले नाहीत तर माथाडी मंडळाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा तीव्र इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी दिला.राज्य सरकारने हमाल-माथाडी कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठवाडा लेबर युनियन व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी ते निदर्शकांसमोर बोलत होते. राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत,या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात अर्थसंकल्प मांडणार असल्याने, त्याचे औचित्य साधून कामगारांनी आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकणे, कायद्याच्या चौकटीतील प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे, कामगारांची हक्काची व कायदेशीर थकबाकी न देणे, बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या कंत्राटदारांना संरक्षण देणे तसेच वेतनवाढीच्या करारांमध्ये टाळाटाळ करणे अशा अनेक मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडविले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला. या निदर्शनांना महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियनचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधीर देशमुख व सरचिटणीस ॲड.सुभाष सावंगीकर यांनी नेतृत्व केले. कामगारांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री व कामगार मंत्र्यांना उद्देशून तयार करून विभागीय आयुक्तांमार्फत पाठविण्यात आले.विभागीय आयुक्त पापळकर यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात मराठवाडा लेबर युनियनचे अध्यक्ष डॉ.सुधीर देशमुख,सरचिटणीस ॲड.सुभाष सावंगीकर,उपाध्यक्ष साथी छगन गवळी,बाजार समिती संचालक साथी देविदास किर्तीशाही,साथी जगन भोजने,साथी भारत गायकवाड व साथी गणेश तरटे यांचा समावेश होता. या आंदोलनात जाधववाडी बाजार समिती,शासकीय धान्य गोदाम तसेच वाळूज,शेंद्रा व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मोठ्या संख्येने माथाडी कामगार सहभागी झाले होते.यामध्ये साथी प्रवीण सरकटे, साथी शिवाजी राऊत,साथी देवचंद आल्हाट,गोदामातील साथी सचिन पगारे,साथी शेख कलीमभाई,साथी फारुखभाई, साथी गौतम भालेराव आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. कामगारांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी संघटनांच्या नेत्यांनी दिला.
More Stories
चिठ्ठीद्वारे निवडीत कळंब पंचायत समिती सभापतीपदी राजश्रीताई वरपे; प्रणिताताई चव्हाण उपसभापती
पालकांनी मुलांवर प्रेमाबरोबर शिस्तीचा धाक ठेवला तरच सक्षम पिढी घडते – डॉ.पांडुरंग भवर
अटमीच्या ‘द बेस्ट लिडर अवॉर्ड’मध्ये सुभाष गायकवाड यांची चौथ्यांदा दमदार कामगिरी