February 27, 2026

येरमाळ्यात येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवासाठी ६ मार्चला नियोजन बैठक

  • कळंब – तालुक्यातील येरमाळा येथे येडेश्वरी देवी मंदिर येथे दरवर्षी भव्य स्वरूपात भरविण्यात येणाऱ्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.ही बैठक दि.६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय,येरमाळा येथे उपविभागीय अधिकारी,कळंब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
    महाराष्ट्रासह परराज्यातही प्रसिद्ध असलेला येडेश्वरी देवीचा यात्रा महोत्सव यंदा दि.१ एप्रिल २०२६ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने सुरक्षाव्यवस्था,वाहतूक नियंत्रण,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता,आरोग्य सेवा, वीजपुरवठा,आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींचे सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
    कळंब तालुका तहसीलदार हेमंत ढोकळे यांच्या दि.२४ फेब्रुवारी २०२६ च्या पत्रानुसार संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत येरमाळा,येडेश्वरी मंदिर संस्थानचे विश्वस्त तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे.यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय ठेवणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
    बैठकीस संबंधित कार्यालयांचे अधिकारी अनिवार्यपणे उपस्थित राहावेत,अन्यथा गैरहजेरीबाबत प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल,असेही पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
    यात्रा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज झाले असून भाविकांसाठी सुरक्षित,सुकर आणि सुव्यवस्थित यात्रा घडवून आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
error: Content is protected !!