February 17, 2026

उपक्रमशील शिक्षक महादेव खराटे यांना ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार’

  • कळंब– तालुक्यातील आढाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील सहशिक्षक महादेव खराटे यांना संजीवनी फाउंडेशन,सिन्नर (जि. नाशिक) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
    दि.१४ फेब्रुवारी रोजी सिन्नर येथे आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते खराटे यांना सहकुटुंब सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
    या सोहळ्यास माजी मंत्री बच्चू कडू, शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,प्रसिद्ध तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर,नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष सानप,महाराष्ट्र राज्य मृदा विभागाचे सहसचिव हरिभाऊ गीते तसेच महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
    श्री.खराटे यांनी शिक्षण क्षेत्रात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे.विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता विकास,मूल्यसंस्कार, डिजिटल साधनांचा वापर,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग अशा उपक्रमांमुळे शाळेची गुणवत्ता उंचावली आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि नवे स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.
    त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय पातळीवर त्यांना सन्मानित करण्यात आल्याने कळंब तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शैक्षणिक,सामाजिक व शासकीय स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या कर्तृत्वाला मिळालेली ही दाद निश्चितच इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
error: Content is protected !!