February 16, 2026

स्वयंशासन दिनातून नेतृत्वाची शिकवण;दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप

  • भाटशिरपूरा – कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय येथे दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यार्थी स्वयंशासन दिन व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश टेकाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कळंब तहसीलचे नायब तहसीलदार गोकुळ भराडिया,ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्यामसुंदर पाटील व ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
    प्रमुख पाहुणे गोकुळ भराडिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चांगली संगत निवडणे, तंत्रज्ञानाचा विधायक उपयोग करणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश दिला.श्यामसुंदर पाटील यांनी अभ्यास,जिद्द व चिकाटी यांचे महत्त्व पटवून देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.माधवसिंग राजपूत यांनी निश्चित ध्येय,आत्मविश्वास व सकारात्मक विचार यांवर भर देत विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी शिक्षकांनी दिलेली ज्ञान-शिस्तीची शिदोरी भावी आयुष्यात उपयुक्त ठरेल, असे सांगितले.
    स्वयंशासन दिनानिमित्त एकदिवसीय मुख्याध्यापक म्हणून प्रतिभा गायकवाड, उपमुख्याध्यापक कार्तिक शिंदे, शिक्षणाधिकारी अमृता तेलंग, उपशिक्षणाधिकारी रोहन शिरसट, गटशिक्षणाधिकारी राधिका पांचाळ व केंद्रप्रमुख प्रथमेश गायकवाड यांनी शाळेचे कामकाज पाहिले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शिक्षक बनून इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले.
    निरोप समारंभात आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वातावरण भावुक झाले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला घड्याळ भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात शरद सूर्यवंशी, श्रीकांत डिकले, एच.ए. पानढवळे, बालाजी ओव्हाळ आदींनीही मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन करण्यात आले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
error: Content is protected !!