February 9, 2026

भीमनगरात माता रमाई जयंती उत्साहात;निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण व शहरातून भव्य मिरवणूक

  • कळंब – कळंब शहरातील भीमनगर परिसरात त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
    सकाळी समाजमंदिरासमोर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण नगरसेविका इंदुमती हौसलमल व भिमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.ध्वजारोहणावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी करत वातावरण भारावून टाकले.
    यानंतर तथागत गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थित नागरिकांनी सामुदायिकरीत्या त्रिशरण व पंचशील ग्रहण करून बौद्ध धम्माच्या तत्त्वांचा स्वीकार व पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

  • यावेळी माता रमाई यांच्या त्यागमय व संघर्षमय जीवनाचा आढावा घेत त्यांच्या योगदानाची माहिती दिली.बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीत माता रमाई यांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यात आले.
    कार्यक्रमानंतर संपूर्ण कळंब शहरातून निळ्या ध्वजांनी सजलेली भव्य मिरवणूक काढण्यात आली.ढोल-ताशा व वाद्यांच्या गजरात,जयभीम व माता रमाई आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात ही मिरवणूक मार्गक्रमण करत होती.महिला, युवक व लहान मुलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.अनेक ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली.
    या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीमनगर येथील शीतल गायकवाड,आशा
    गायकवाड,मालनबाई गायकवाड, शितल गायकवाड,वैशाली ठानांबिरे,कोमल हौसलमल आदी पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

  • महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे जयंती सोहळा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
    भीमनगरात माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात,एकात्मतेच्या भावनेने आणि सामाजिक संदेश देणाऱ्या वातावरणात संपन्न झाली.
error: Content is protected !!