February 6, 2026

कळंबमधील ज्येष्ठ नागरिकांची अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • कळंब – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रासह कळंब तालुक्यातही शोककळा पसरली आहे.
    या पार्श्वभूमीवर कळंब येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र बालोद्यान येथे दि.३१ जानेवारी रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. ही सभा कळंब पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर (दादा) खोसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली अर्पण करताना अध्यक्ष भास्कर दादा खोसे भावूक झाले. “अजितदादांच्या अपघाताची बातमी ऐकून मन सुन्न झाले. राज्यातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.दादांनी जनसामान्यांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या जाण्याने ग्रामीण विकास, सहकार आणि उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचा आधारस्तंभ हरपला,” असे त्यांनी सांगितले.यावेळी फेडरेशनचे संचालक भागवतराव धस यांनी अजितदादांच्या कार्याचा झपाटा, उरक आणि जनहिताच्या भूमिकेचा उल्लेख करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी “कंठी प्रेम दाटे, नैयनी नीर” या शब्दांत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
    सुरेश टेकाळे यांनी दादांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ त्र्यंबकराव मनगिरे, डी.डी. गायकवाड, संपादक सुभाष घोडके, यशवंत हौसलमल, माणिकराव लोहार यांनीही श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
    कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील कमलाकर पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोर्डेकर, सावंतसर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माधव सिंग राजपूत यांनी केले.
error: Content is protected !!