वारसा नाही,शिफारस नाही;फक्त जिद्द,शिस्त आणि सेल्फ स्टडी कळंब – “स्वप्न मोठे असले की परिस्थिती लहान ठरते,” हे वाक्य कळंबचे भूमिपुत्र गोकुळ आशा विष्णुदास भराडिया (वय ३२) यांनी आपल्या जीवनप्रवासातून अक्षरशः सिद्ध करून दाखवले आहे.कोणताही शासकीय वारसा, राजकीय शिफारस किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ सेल्फ स्टडी,कठोर परिश्रम,जिद्द आणि चिकाटी या भांडवलावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवत सहाय्यक विक्रीकर आयुक्त (जी.एस.टी. विभाग),श्रेणी–१ हे प्रतिष्ठेचे पद पटकावले आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोकुळ भराडिया यांचा प्रवास सोपा नव्हता.अभ्यासासाठी कोणतीही कोचिंग क्लासेसची मदत न घेता,त्यांनी नियोजनबद्ध अभ्यास,संदर्भग्रंथांचे वाचन, मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल सराव आणि सातत्यपूर्ण पुनरावृत्ती यावर भर दिला.याच अभ्यासपद्धतीच्या जोरावर त्यांनी २०२० साली एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत नायब तहसीलदार पदाची नियुक्ती मिळवली. नायब तहसीलदार म्हणून सोलापूर येथे सेवा बजावल्यानंतर,सध्या ते कळंब,जिल्हा धाराशिव येथील तहसील कार्यालयात कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळत असतानाच, मर्यादित वेळेत त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. दिवसाचे ठराविक तास, शिस्तबद्ध वेळापत्रक आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ही दुसरी मोठी प्रशासकीय झेप घेतली आहे. शैक्षणिकदृष्ट्या ते अत्यंत गुणवंत असून,त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे येथून बी.टेक (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) ही पदवी संपादन केली आहे. अभियांत्रिकी शिक्षणानंतरही प्रशासकीय सेवेकडे वळण्याचा त्यांचा निर्णय समाजाभिमुख सेवेची तळमळ दर्शवतो.
अत्यंत शांत,प्रेमळ,संयमी आणि मृदू स्वभावाचे गोकुळ भराडिया हे सहकारी व नागरिकांमध्ये आदराने ओळखले जातात.आपल्या यशाबाबत ते नेहमीच कुटुंबीय, गुरुजन आणि स्वतःच्या परिश्रमांचे श्रेय देतात.यशानंतर त्यांनी नवतरुणांना मार्गदर्शन करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आजच्या तरुणांनी मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर तसेच गर्लफ्रेंड–बॉयफ्रेंडच्या आभासी दुनियेत वेळ वाया घालवू नये.ध्येय निश्चित करून मोबाईलवर नियंत्रण ठेवले, तर यश नक्कीच मिळते.” त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल दि.१५ जानेवारी २०२६,शुक्रवार रोजी सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने कळंब तहसील कार्यालयात विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यकारी संपादक अविनाश रंजना सुभाष घोडके यांनी त्यांना अंक देऊन गौरव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कळंब तालुक्याच्या मातीने घडवलेला हा होतकरू अधिकारी आज राज्याच्या महसूल व कर प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारत असून,गोकुळ भराडिया यांची यशोगाथा ग्रामीण भागातील असंख्य युवकांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन