February 9, 2026

माळ करंजातील ‘आनंद बाजार’ ठरला विद्यार्थ्यांचा उद्योगशाळा प्रयोग — खरेदी-विक्रीतून घडले उद्योजक !

  • माळ करंजा – येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये व प्रत्यक्ष जीवनानुभव मिळावा,या उद्देशाने आनंद बाजार या अभिनव उपक्रमाचे आयोजन सकाळी ९ ते १२ या वेळेत करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
    या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला,फळे,खाऊचे पदार्थ, तसेच विविध मनोरंजनात्मक फनी गेम्सचे स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच विक्रेते व ग्राहक बनून खरेदी-विक्री, व्यवहार,पैशांचे नियोजन आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.त्यामुळे लहान वयातच उद्योजकतेचे प्राथमिक धडे विद्यार्थ्यांना सहजपणे मिळाले.
    या उपक्रमाला माळ करंज गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे भरभरून कौतुक केले. पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करत भविष्यात अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
    या संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आयोजन शाळेचे मुख्याध्यापक जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेला हा आनंद बाजार उपक्रम प्रेरणादायी ठरला असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची देणारा ठरला आहे.
error: Content is protected !!