मराठवाड्यात उभी राहिलेली जी सामाजिक क्रांती अर्थ-रणजीत म्हणून ओळखली जाते,ती केवळ एका विद्यापीठाच्या नावापुरती मर्यादित नव्हती.ती दलित-बहुजन समाजाच्या अस्मितेची, स्वाभिमानाची आणि इतिहासावरच्या हक्काची लढाई होती. मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी जेव्हा पुढे आली, तेव्हा ती सत्ताधारी आणि जातीय वर्चस्ववादी शक्तींना अस्वस्थ करणारी ठरली.कारण बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेबांचे नाव म्हणजे हजारो वर्षांच्या अन्यायाला दिलेले थेट आव्हान होते. त्यामुळेच या मागणीला विरोध करत मराठवाडाभर हिंसाचार,बहिष्कार आणि दडपशाहीचा उद्रेक झाला. पण या अंधारातही भीमसैनिकांच्या संघर्षाची मशाल पेटलेली होती. या संघर्षात अनेक तरुण, कार्यकर्ते आणि सामान्य कष्टकरी लोक रस्त्यावर उतरले. ते कोणत्याही सत्तेचे संरक्षण घेऊन नव्हते, तर परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरां विचारांची ढाल घेऊन लढत होते. या लढ्यात काहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. दिलीप सूर्यभान रामटेके हे अशाच शूर भीमसैनिकांपैकी एक होते. नामांतर आंदोलनाच्या उग्र काळात ते गोळीबारात शहीद झाले.त्यांचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता,तर तो संपूर्ण चळवळीला अधिक आक्रमक आणि निर्धाराने उभे राहण्याची प्रेरणा देणारा ठरला. त्यांच्या रक्ताने या आंदोलनाला नवी ताकद मिळाली. ज्ञानेश्वर बुधाजी साखरे हेही या संघर्षातील एक तेजस्वी नाव होते. अत्याचार,बहिष्कार आणि दहशतीच्या वातावरणातही त्यांनी मागे हटणे नाकारले. विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला मिळावे,ही त्यांची एकनिष्ठ भूमिका होती.संघर्षाच्या आगीत झोकून देताना त्यांनी आपले प्राण गमावले,पण त्यांचा लढवय्या वारसा आजही भीमसैनिकांच्या स्मरणात जिवंत आहे. रोशन बोर्कर हा तरुण देखील या रणात शहीद झाला.तो केवळ आंदोलनात सहभागी नव्हता,तर आपल्या अस्तित्वासाठी,आपल्या आत्मसन्मानासाठी लढणारा एक सामान्य माणूस होता. त्याच्या शहादतीने हे सिद्ध झाले की हा लढा केवळ नेत्यांचा नव्हता, तर तो रस्त्यावरच्या माणसांचा होता. प्रज्ञासूर्य कांतदर्शी डॉ.बाबासाहेबांच्या नावासाठी जीव देण्याची तयारी असलेली पिढी त्या काळात उभी राहिली होती. डोमाजी भिकाजी कुत्तरमारे यांचे नावही या बलिदानी यादीत अजरामर आहे. त्यांनी जातीय अन्यायाविरुद्ध उभे राहत संघर्षाची मशाल हातात घेतली आणि अखेर त्या मशालीसाठी स्वतःचे जीवन अर्पण केले.त्यांची शहादत ही मराठवाड्यातील दलित-बहुजन समाजाच्या जिद्दीची साक्ष देणारी होती.
या सर्व शहीदांची शहादत व्यर्थ गेली नाही त्यांच्या रक्तातूनच मराठवाड्यातील सामाजिक क्रांतीला बळ मिळाले.शेवटी प्रस्थापित सत्तांना माघार घ्यावी लागली आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला अधिकृतपणे देण्यात आले. हा केवळ नावाचा विजय नव्हता,तर तो हजारो अपमान,अत्याचार आणि बलिदानांवर मिळवलेला स्वाभिमानाचा विजय होता. आज जेव्हा आपण प्रज्ञासूर्य, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव उच्चारतो,तेव्हा त्यामागे दिलीप रामटेके,ज्ञानेश्वर साखरे, रोशन बोर्कर,डोमाजी कुत्तरमारे आणि असंख्य अज्ञात भीमसैनिकांच्या त्यागाची गाथा दडलेली आहे.ही अर्थ-रणजीत क्रांती सांगते की इतिहास कधीही सहज बदलत नाही,तो रक्त,संघर्ष आणि अविचल धैर्याने घडवावा लागतो.
– अविनाश रंजना सुभाष घोडके कार्यकारी संपादक सा.साक्षी पावनज्योत,कळंब
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन