कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर व मंडळाच्या कार्यक्षम संचालिका आणि त्यांची सहचारिणी प्रा.अंजली मोहेकर या दोघांचा दोन महिन्यांच्या अमेरिका दौर्यानंतर काल दि.१० डिसेंबर २०२५ रोजी रात्री धाराशिव जिल्ह्यात उत्साहपूर्ण परतावा झाला. सुमारे दोन महिन्यांच्या या शैक्षणिक,सांस्कृतिक आणि प्रशासकीय अभ्यासमूल्य असलेल्या दौर्यात त्यांनी अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये वास्तव्य करून तेथील सामाजिक–शैक्षणिक रचनेचा प्रत्यक्ष अभ्यास केला. आज दि.११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत कळंब येथील त्यांच्या निवासस्थानी साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील द्रष्टे व्यक्तिमत्त्व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या कार्याची शाश्वत परंपरा पुढे नेण्याच्या ध्येयातून व स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योत या साप्ताहिकाचा विशेषांक श्री.माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मातोळाचे प्राचार्य अजित साळवे व कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांनी मोहेकर दांपत्यांचा यथोचित सत्कार केला. सत्कारावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्ञान प्रसारक मंडळाच्या निष्ठावान कार्याची,समाजभानाची व शैक्षणिक उंचीची प्रशंसा करत मोहेकर दांपत्यांनी केलेल्या अमेरिकन अभ्यासदौर्याचे महत्त्व अधोरेखित केले. ★अमेरिकेचे अनुभव : स्वच्छता, शिस्त आणि सुव्यवस्था यांचे अनोखे जग या प्रसंगी डॉ.मोहेकर यांनी अमेरिकेतील अनुभवांची सविस्तर मांडणी करताना सांगितले की—अमेरिका हा विस्तीर्ण भूभाग,आकर्षक नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिक तंत्रज्ञानिक सुविधांनी नटलेला देश असून,नागरिकांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या उच्चस्तरीय सुविधा,प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि काटेकोर अंमलबजावणी,रस्ते, वाहतूक आणि सार्वजनिक ठिकाणांची अद्वितीय स्वच्छता, निसर्गाचे संवर्धन करत केलेले सुस्थित नियोजन,नागरिकांच्या जीवनशैलीतील शिस्तबद्ध स्वभाव यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधणारा हा देश जागतिक पातळीवर आदर्श कसा ठरतो याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे सांगितले. प्रा.अंजली मोहेकर यांनी विशेषतः अमेरिकेतील शिक्षण प्रणालीवर भाष्य केले.तिथल्या शाळा–महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच आत्मविश्वास, अन्वेषणक्षमता आणि सामाजिक जबाबदारी जोपासण्यावर दिला जाणारा भर त्यांनी गौरवला. विद्यार्थ्यांमध्ये उपजत नेतृत्वगुण निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. मोहेकर दांपत्यांनी अमेरिकेतील लोकशाही शिस्त, नागरिकाधिकारांची जपणूक आणि सार्वजनिक संपत्तीच्या वापरातील सजगता यांचा अभ्यास करून त्यातील सकारात्मक मुद्दे स्थानिक शिक्षण व सामाजिक उपक्रमांमध्ये लागू करण्याची तयारी दर्शवली. तेथे विकसित झालेल्या पर्यावरण जपणूक,वाहतूक व्यवस्थापन,शिक्षणातील बहुआयामी पद्धती,युवा नेतृत्वविकास या बाबींचे तंत्र कळंब तालुक्यातील विद्यार्थी व संस्था यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सा.साक्षी पावनज्योतचे उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,श्री.माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अजित साळवे,प्रा.विलास आडसुळ,कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड