February 8, 2026

ओबीसी संघर्ष समितीचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा;रश्मी मुंदडांच्या विजयाला बळ

  • कळंब – कळंब नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवत ओबीसी संघर्ष समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कविता प्रेमचंद गोरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रश्मी संजय मुंदडा तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
    मुंडे कॉम्प्लेक्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार व जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या उपस्थितीत हा महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला.कळंब नगरपरिषद निवडणुकीतील हा पाठिंबा महाविकास आघाडीची ताकद वाढवणारा ठरत आहे.
    पत्रकार परिषदेस आमदार कैलास पाटील,काँग्रेसचे राज्य सचिव पांडुरंग कुंभार,तालुकाध्यक्ष अप्पासाहेब शेळके,ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते अरुण जाधवर, शिवसेना निवडणूक प्रभारी व माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, शिवसेना तालुकाध्यक्ष सचिन काळे,प्रेम गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
    ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते अरुण जाधवर म्हणाले, “आज सकाळी घेतलेल्या बैठकीत समितीने एकमुखाने निर्णय घेतला. खासदार ओमप्रकाश (राजू) राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची विकासाची दूरदृष्टी, तसेच नगराध्यक्ष म्हणून संजय मुंदडा यांनी केलेला विकास — हाच कळंब शहर वाचवू शकतो. रश्मी मुंदडा ह्या देखील ओबीसी समाजातील आहेत. मतविभाजनाचा फायदा जातीयवादी राजकारणाला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देतो.”
    कळंब शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे आमदार कैलास पाटील म्हणाले,“शहराची प्रगती, सुरक्षितता आणि सोयीसुविधांचा विकास हे आमचे प्राधान्य आहे. महाविकास आघाडीकडून लोकांच्या विश्वासास पात्र ठरणारे उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचंड विजयासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे.”
    ओबीसी संघर्ष समितीच्या जाहीर पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी संजय मुंदडा यांच्या विजयाची समीकरणे अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते. कळंबमधील ही घडामोड निवडणूक वातावरण अधिक चुरशीचे बनवून गेली आहे.
error: Content is protected !!