धाराशिव (जिमाका) – विद्यार्थीदशेतूनच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व गोष्टींचा अभ्यास करावा.त्या आयुष्यभर लक्षात राहतात.फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीच संशोधन करावे असे नसून,सार्वजनिक व वैयक्तिक जीवनातील दैनंदिन घटना वैज्ञानिक दृष्टीने पाहून त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. १७ नोव्हेंबर रोजी लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षांसाठी आयोजित इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके, गुजरात येथील इनोव्हेशनच्या परीक्षक शिवानी सिंग,उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे,उमरगा गटविकास अधिकारी राजपूत,लोहाराचे शिवकुमार बिराजदार,शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी,लातूर येथील बी.के.हाश्मी, श्री.राऊत,श्री.देवगुडे,ज्ञान प्रबोधिनीच्या गौरी कापरे,परीक्षक डॉ.प्रवीण काळे आदी मान्यवर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, पूर्वी प्रयोग करण्यासाठी किंवा मनातील कल्पनांना वैज्ञानिक रूप देण्यासाठी शालेयस्तरावर कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हत्या.मात्र आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ते माध्यमिक शाळांपर्यंत ग्रामीण व शहरी भागात प्रयोग व अभ्यासासाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार दैनंदिन जीवनातील साहित्याचा वापर करून प्रयोग करता येतात.मनातील कल्पनांना वास्तवात उतरविणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पुजार पुढे म्हणाले की,सी.व्ही.रमण, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यासारख्या महान शास्त्रज्ञांनी कल्पनाशक्तीवर भर दिल्यामुळेच ते वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू शकले.त्यामुळे दैनंदिन जीवनात समोर येणाऱ्या नाविन्यपूर्ण गोष्टींच्या पाठीमागील कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.”हे असे का झाले असे का होते” असा प्रश्न वारंवार स्वतःला विचारावा,असे त्यांनी सांगितले. कला,वाणिज्य व विज्ञान — सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी चिकित्सक व जिज्ञासू वृत्ती ठेवून संशोधनाचा प्रयत्न करावा,असे आवाहन श्री.पुजार यांनी केले.लहान वयातील अनुभव कायम स्मरणात राहतात व प्रेरणादायी असतात,असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष म्हणाले की,मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी असूनही अशा प्रदर्शनात सहभागी झालो नाही याची खंत आहे.संशोधन हे फक्त विज्ञान शाखेतच होत नाही,तर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी चिकित्सक दृष्टीकोनातून संशोधन करू शकतात. संशोधन हे केवळ नोकरी किंवा पुरस्कारासाठी नसून जीवनासाठी प्रेरणादायी आहे.एखाद्या विषयात संशोधन करायचे असल्यास ते आत्मकेंद्रित करून त्यासाठी झटावे,असे त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी श्रीमती साळुंके म्हणाल्या की,विज्ञान हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे.विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी ओढ निर्माण करण्यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. सन २०१० पासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन होत असून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शासनामार्फत १० हजार रुपये अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरविलेला प्रयोग म्हणजे ‘विज्ञान’ असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. थोर शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थिनीनी स्वागतगीत व विज्ञानगीत सादर केले.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्रीमती.साळुंके यांनी केले.सूत्रसंचालन सतीश कानडे यांनी केले.आभार जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री.स्वामी यांनी मानले.यावेळी धाराशिव,लातूर व नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९९ विविध विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन – या प्रदर्शनात ‘वॉटर ट्रस्ट कलेक्टर’,‘ट्रॅफिक वाइज कंट्रोलर’,‘फायर फायटिंग रोबोट’, रस्त्यावरील वाहनांचे वजन मोजणे’, ‘वृद्ध-अंध-अपंगांचा जीवनसाथी’,‘लेझर सिक्युरिटी’,‘हाऊस फोनचा आवाज वाढविणे’,‘आंधळ्याची काठी’, ‘आधुनिक कांदा शीतगृह’,‘रेल्वे ट्रॅक ओळख सूचना प्रणाली’,‘हाताने पेपर तयार करणे’,‘छातीचा कॅन्सर टाळण्यासाठी सेन्सर’,‘रेल्वे इंटरलॉकिंग सिस्टीम व अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था’,‘ट्रॅफिक कमी करण्यासाठी चौथा दिवा’,‘प्लास्टोस्कोप’,‘स्मार्ट कुकर’,‘स्मार्ट ड्रेनेज अँड वेस्ट मॅनेजमेंट’ आदींसह १९९ विविध प्रयोगांचे मॉडेल सादर करण्यात आले.प्रदर्शनात धाराशिव,लातूर व नांदेड जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण व मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान