११ नोव्हेंबर संपूर्ण देशात शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो कारण आजच्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर १८८८ रोजी भारताचे पहिले शिक्षणमंत्री, थोर देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मक्का येथे जन्म झाला. मौलाना आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहिनुद्दीन असे होते. अबुल कलाम ही त्यांना पदवी मिळाली होती. ‘अबुल कलाम’ म्हणजे वाचस्पती. पुढे त्यांनी स्वतःच्या नावापुढे ‘आझाद’ लावले. त्यांचे वडील हे भारतीय होते तर आई अरब होती.
अबुल कलाम आझाद यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. अगदी लहान वयातच त्यांनी आरबी, फारशी आणि उर्दू या भाषांचे ज्ञान मिळवले. त्यांना तर तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि गणित विषयाची आवड होती. तसेच इस्लाम धर्माचा त्यांना गाढ अभ्यास होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी पत्रकारिता सुरू केली. इंग्रजी सत्तेच्या अन्याया–अत्याचाराविरोधात जनजागृती करावी यासाठी त्यांनी ‘अल-हिलाल’ नावाचे उर्दू साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकातून ते इंग्रजांविरुद्ध रण पेटवत असत त्यामुळे इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. काही दिवसांनी त्यांनी ‘अल-बलाग’ नावाचे दुसरे साप्ताहिक सुरू केले. ते आपल्या लेखणीतून इंग्रज राजवटीविरुद्ध जनतेला जागृत करीत.
मुस्लिम समाजानेही स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घ्यावा यासाठी ते मुस्लिम तरुणांना प्रोत्साहित करीत. अबुल कलाम आझाद यांना इस्लाम धर्माचा गाढ अभ्यास असल्याने त्यांनी आपल्या धर्माची तत्त्वे शेवटपर्यंत जपली. असे असले तरी मानवता हाच खरा धर्म आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मानवता धर्माचाच आचरण करायला हवे असे ते म्हणत. महात्मा गांधींचे ते सच्चे अनुयायी होते. गांधीजींच्या आदेशानेच त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे ते काँग्रेसचे प्रमुख नेते बनले. इतकेच नाही तर वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्षही बनले. काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यावर त्यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्यावर भर दिला.
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना अटक झाली, तुरुंगवास झाला. पण त्यांनी देश स्वतंत्र करण्याचे जे व्रत स्वीकारले त्यातून माघार घेतली नाही. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात त्यांना शिक्षणमंत्री म्हणून स्थान मिळाले. ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत देशात शिक्षणाचा प्रसार व प्रचार केला. त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांना त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य देश कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचे कर्तृत्व प्रभावी होते तसेच ते उत्तम लेखक होते. कुराणाचा अनुवाद केलेला ‘तर्जुमानुल कुरआन’ हा त्यांचा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. ‘इंडिया विन्स फ्रीडम’ हे त्यांचे स्वचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. मौलाना आझाद यांना परराष्ट्र नितीचा खूप अभ्यास होता, विशेषतः युरोपच्या तत्कालीन परिस्थितीचे त्यांना खूप ज्ञान होते. ते जितके तल्लख बुद्धीचे होते तितकेच मनमिळावू स्वभावाचे होते. लॉर्ड बेटनली जे इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य होते ते मौलाना आझाद यांच्या विषयी म्हणतात— “मौलाना आझाद विशाल मनाचे व्यक्ती होते.”
देश स्वतंत्र व्हावा तसेच देशाची अखंडता कायम राहावी यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. १९९२ साली केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला. मौलाना आझाद यांचे २३ फेब्रुवारी १९५८ रोजी निधन झाले.
अशा जयंतीदिनी अशा महान देशभक्त व शिक्षणतज्ञ नेत्याच्या पावन स्मृतीस क्राईम संध्या परिवारातर्फे विनम्र अभिवादन.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड