February 8, 2026

धाराशिवमध्ये रणजीत बनसोडे यांचे उपोषण;भीम आर्मीची डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकासाठी लढाई तीव्र — विनोद कोल्हेंचा इशारा!

  • धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) उपशाखा धाराशिव येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारी “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” अशी भव्य कमान उभी करण्यात यावी,तसेच परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या मागण्यांसह कसबा ताडोळे येथील ऐतिहासिक मुक्काम स्थळी डॉ.आंबेडकरांचे स्मारक उभारावे या मागण्यांसाठी भीम आर्मीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बनसोडे हे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
    मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद भाऊ कोल्हे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन बनसोडे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्या तत्काळ मान्य करण्याची विनंती करण्यात आली.समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी तडवळे येथे परमपूज्य डॉ.बाबासाहेबांचे स्मारक लवकरच उभे राहील आणि त्यासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू असल्याचे लेखी पत्रही उपोषणस्थळी सुपूर्द केले.
    या प्रसंगी आरपीआय (आठवले गट) धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ भाऊ गायकवाड,लातूर जिल्हा संघटक सोनू घोडके,लातूर तालुका अध्यक्ष बाप्पा घनगावकर, धाराशिव तालुका अध्यक्ष विश्वनाथ कांबळे,धाराशिव शहराध्यक्ष विश्वास पेठे आणि शहर उपाध्यक्ष फायज पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
    “जर मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,”असा इशारा माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद भाऊ कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
error: Content is protected !!