कळंब – अतिवृष्टी,पूर आणि आत्महत्येच्या संकटांनी उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील एकल महिला शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनकडून हरभरा आणि ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.पर्याय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला असून या कार्यक्रमाने शेतकरी महिलांना नवजीवनाची उमेद दिली आहे. हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नसून,आत्महत्याग्रस्त व पूरग्रस्त कुटुंबांना भावनिक दिलासा देणारा ठरला. “एकल शेतकरी महिलेला नवा विश्वास आणि नव्या हंगामाचे बळ मिळावे” या हेतूने नाम फाउंडेशन आणि पर्याय संस्थेने या बियाणे वाटपाचा कार्यक्रम पर्याय संस्थेच्या प्रांगणात आयोजित केला.
या कार्यक्रमासाठी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश (ओमराजे) निंबाळकर,कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील, नाम फाउंडेशनचे संचालक राजाभाऊ शेळके आणि पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी केले.यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, नाम फाउंडेशनचे संचालक राजाभाऊ शेळके,ऋषिकेश तोडकर यांनी आपले विचार व्यक्त केले.ओमराजे निंबाळकर यांनी पर्याय संस्थेच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचे कौतुक करताना म्हटले, “मदत आणणे सोपे असते, पण ती योग्य हातांपर्यंत पोहोचवणे ही खरी सेवा आहे.पर्याय संस्था हे कार्य मनापासून करत आहे.” या कार्यक्रमासाठी सहा काउंटर उभारण्यात आले होते.कुपन पद्धतीद्वारे शिस्तबद्धरित्या बियाणे वाटप करण्यात आले.वाटपासाठी पर्याय सामाजिक संस्थेच्या सुनंदा खराटे,अनिताताई तोडकर, परमेश्वर गवारे,भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे,विकास कुदळे, जानवी शिंदे,ज्योती शिंदे,वंदना चिलवंत,अश्विनी शिंदे,दर्शन जोगी, वैभव चोंदे,अशोक शिंदे,आश्रुबा गायकवाड,स्वाती कवडे,रियाज शेख,दिगंबर लडके,कल्पना जतकर,रफिक शेख,प्रकाश तोडकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गोडगे यांनी केले,तर आभार प्रदर्शन महेश पोतदार यांनी मानले.कार्यक्रमात उपस्थित महिलांना अल्पोपहार देऊन व बियाण्यांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमामुळे “नाम” फाउंडेशन आणि “पर्याय” संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नवजीवनाची नवी वाट दाखवली आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन