कळंब – मराठवाड्याच्या शिक्षणविश्वात आपली अविरत सेवा,संयमी स्वभाव आणि विद्यार्थ्याभिमुख कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे प्रा.डॉ.रामराव आत्माराम माने (वय ७०) आणि त्यांची पत्नी सौ.रत्नमाला माने यांचे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. संभाजी नगर येथील पडेगाव रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने माने दाम्पत्याला जोराची धडक दिली.या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.या घटनेने संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दीर्घकाळ प्राध्यापक,संशोधक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत राहून माने यांनी हजारो विद्यार्थ्यांना दिशा,आत्मविश्वास आणि प्रोत्साहन दिले. ग्रामीण पार्श्वभूमीतून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचा ते खऱ्या अर्थाने आधारस्तंभ ठरले.कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांना निवास,मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य अशा विविध प्रकारे त्यांनी निःस्वार्थ सेवा केली. #कार्याचा गौरवशाली प्रवास – मूळचे रुईभर (ता.धाराशिव) येथील माने यांनी शिक्षणासाठी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी गाव सोडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी संशोधक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली.त्यानंतर प्राध्यापक, विभागप्रमुख व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक या जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यांच्या कार्यशैलीत शिस्त, माणुसकी आणि विद्यार्थ्यांप्रती अपार माया हे त्रिसूत्री तत्त्व कायम दिसून येत असे. # सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व – सेवानिवृत्तीनंतरही माने यांनी विद्यार्थ्यांशी असलेलं नातं तोडलं नाही.ते विविध महाविद्यालयांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन करत, विद्यार्थीवसतिगृहांना मार्गदर्शन देत आणि सामाजिक संस्थांशी जोडून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवत राहिले. # शैक्षणिक विश्वात शोककळा – या दुर्दैवी अपघाताच्या वृत्ताने संपूर्ण मराठवाडा शैक्षणिक विश्वात शोककळा पसरली आहे. ते ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांचे निकटचे मित्र होते. मोहेकर म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी आयुष्य झटवणारा एक जीव आज हरपला आहे.” ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल मोहेकर,सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,तसेच सहकारी,माजी विद्यार्थी आणि समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माने दाम्पत्याचे पार्थिव रुईभर (ता. धाराशिव) येथे नेण्यात आले असून, तेथेच त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. “सरांच्या कार्याने घडलेली प्रत्येक विद्यार्थीपिढीच त्यांचे अमर स्मारक आहे.”मराठवाडा त्यांचा ऋणी राहील.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन