
- ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव हे मराठवाड्याचे भूषण होते,कळंबचे वैभव होते. त्यांची साहित्यसंपदा कितीजणांनी वाचली, हा शोधाचा विषय आहे. लाल चिखल या वास्तववादी कथेनंतर त्यांची राज्यात ओळख झाली. नव्या पिढीला मात्र ते समजलेच नाहीत…
सेवानिवृत्तीनंतर ते कळंब येथे वास्तव्यास आले. खरं तर ते कळंबचे वैभव होते. राज्यात भास्कर चंदनशिवचे कळंब अशी ओळख होती. ते आप्पा नावाने ओळखले जायचे. पण नवोदित साहित्यिकांना ते ओळखता आले नाहीत. ते मितभाषी होतेच, शिवाय मुलाच्या अपघाती निधनानंतर त्यांनी बाहेर मिसळणे कमी केले. त्यांनी कमी केले असले तरी त्यांच्या कडे जाऊन कितीजणांनी भेट घेतली? त्यांच्या नव्या साहित्याबद्दल चर्चा केली का? अगदी बोटावर मोजण्याइतकेच जण त्यांच्या घरी जात होते.
मी काही वर्षे लोकसत्तामध्ये काम करत होतो. त्यावेळी सतीश कुलकर्णी सर हे मराठवाडा आवृत्तीचे काम पाहत होते. त्यांनी मला फोन करून विचारले – “तू भास्कर चंदनशिव यांच्या गावचा आहेस का?” मीही आश्चर्यचकित झालो. पण चंदनशिव यांचे गाव म्हणून आपल्या कळंबचा लौकिक आहे, हे मनाला भावले. आणि मी त्या गावचा आहे, हे माझं भाग्य समजलो.
सतीश कुलकर्णी सरांचा निरोप घेऊन मी आप्पांकडे गेलो आणि आपण लोकसत्तामध्ये आठवड्याला एक स्तंभ लिहावा, अशी विनंती केली. अगोदर त्यांनी नकार दिला, पण पुन्हा विनंती केल्यानंतर होकार दिला. आणि मग त्यांचा सहवास लाभला. जवळपास एक वर्षभर दर आठवड्याला त्यांच्या घरी जाऊन त्यांनी लिहिलेला स्तंभ मी आणत होतो आणि तो फॅक्स करत असे. त्या सर्व लेखांचं २००९ साली पुस्तकात रूपांतर झालं. त्या पुस्तकात त्यांनी माझा उल्लेख करून – “केवळ सतीश टोणगेमुळे साहित्य क्षेत्रात पुस्तक दाखल झालं” – असं मोठ्या मनाने कौतुक केलं.
मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. त्यांच्या साहित्य अनुभवाचा उपयोग धाराशिव जिल्ह्याला घेता आला नाही.
त्यांच्या निधनाच्या आठवडाभर आधीच मी त्यांच्या घरी भेट घेतली होती. पण त्यांच्या निधनाचे अर्धवट वृत्त काहीजणांनी शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे राज्यभरातून फोन येऊ लागले आणि त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप झाला. प्रत्यक्षात त्यांचे निधन रविवारी दुपारी झाले. मनाला चटका लावून गेले. चुकीचे वृत्त देणाऱ्यांना ही भास्कर चंदनशिव कळालेच नाहीत…
कळंब तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते भरभरून बोलले होते. पत्रकार संघाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले होते आणि “शेतकऱ्यांना ही पुरस्कार द्या” अशी सूचना केली होती. त्या सूचनेनंतर पत्रकार संघाने कृषी दिनानिमित्त कृषी वैभव पुरस्कार देऊन शेतकऱ्यांना सन्मानित करण्यास सुरुवात केली.
प्रसिद्ध कथाकार आणि ग्रामीण साहित्य चळवळीतील महत्त्वपूर्ण साक्षीदार प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले तेव्हा ते ८० वर्षांचे होते. त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात आणि बीड येथील बलभीम महाविद्यालयात दीर्घकाळ प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. निवृत्तीनंतर ते आपल्या गावी कळंब येथे स्थायिक झाले.
ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण समाजातील स्थित्यंतरे चित्रित केली. त्यांच्या नावावर पाच कथासंग्रह, ललित लेखन, समीक्षा आणि संपादन अशी संपदा आहे. अलीकडे ते आजारी असल्याने फारसे बाहेर कार्यक्रमांना जात नसत. डॉ. केदार काळवणे यांनी त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन करणारा गौरव ग्रंथ संपादित केला आहे. या ग्रंथाचा लवकरच प्रकाशन सोहळा होणार होता, पण तो आता राहून गेला.
मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. मराठी साहित्यात मौलिक भर घालणाऱ्या आणि ग्रामीण साहित्यातील विद्रोही, व्यापक भूमिका असलेल्या भास्कर चंदनशिव यांच्या निधनाने अपरिमित हानी झाली आहे.
आता तरी नव्या पिढीने भास्कर चंदनशिव यांना समजून घ्यावे, कळावे यासाठी त्यांच्या साहित्यसंपदेचे सामूहिक वाचन होणे गरजेचे आहे. 
- –– ✍️ सतीश टोणगे
📞 9422936081

More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड