कळंब – आजच्या काळात रस्त्यावर अपघात झाल्यास बहुतांश लोक नुसते बघ्याची भूमिका घेतात,कुणी मदत करण्याऐवजी फोटो-व्हिडिओ काढण्यात व्यस्त राहतात.मात्र कळंब येथील काळे कुटुंबीयांनी मानवतेचा आदर्श घालून देत एका अपघातातील चौघा अनोळखी जखमींना तातडीची मदत केली आणि एका गंभीर जखमीचा जीवही वाचवला.ही घटना धाराशिव जिल्ह्यातील मांजरा नदीच्या पुलाजवळ घडली. या प्रकरणाविषयी माहिती देताना ईश्वर मनोहर काळे यांनी सांगितले की, “मी व माझा पुतण्या समर्थ जीवन काळे मीटिंग आटोपून अंतरवाली सराटी येथून कळंबकडे परतत होतो. रात्री साडेसातच्या सुमारास मांजरा नदी पुलाजवळ आलो असता मोटरसायकल व अज्ञात वाहनाचा अपघात झालेला दिसला. चौकशी केल्यावर चार जण गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले. आम्ही क्षणाचाही विलंब न करता जखमींना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला.” दरम्यान, त्याचवेळी ईश्वर काळे यांचे चुलते मोहन प्रल्हादराव काळे आपल्या कारने आंबेजोगाईहून परत येत होते. त्यांच्या गाडीत तिघा जखमींना घालून कळंब येथील सरकारी इस्पितळात आणण्यात आले.प्राथमिक उपचारांदरम्यान डॉक्टरांनी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत त्याला तातडीने आंबेजोगाई येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्या क्षणीपर्यंत जखमींची ओळख पटली नव्हती.तरीही काळे कुटुंबीयांनी जबाबदारी घेत रुग्णाला ॲम्बुलन्सने आंबेजोगाई सिव्हिल हॉस्पिटलला हलवले. यासाठी गणेश काळे यांनी स्वतःचे गॅरेज बंद करून मदतीस धाव घेतली. दरम्यान,अपघातग्रस्त मोटरसायकलचा फोटो व त्यावरील नंबर प्लेटच्या आधारे माहिती शोधण्यासाठी सौ.कोमल मोरे (काळे), RTO कार्यालय आंबेजोगाई यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मिळवून दिला आणि त्यांना अपघाताची माहिती पोहोचवली. जखमीला आंबेजोगाई येथे दाखल करून योग्य वेळी उपचार सुरू झाल्याने त्याचा जीव वाचला. सध्या तो लातूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून प्रकृती स्थिर आहे. “आई जगदंबेच्या कृपेने एका बेवारस जखमीचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे समाधान आम्हाला लाभले,” असे समाधान व्यक्त करताना ईश्वर काळे यांनी सांगितले.
★काळे कुटुंबीयांच्या परोपकारी वृत्तीचे सर्वत्र कौतुक
या कार्यात ईश्वर मनोहर काळे, गणेश पप्पु काळे,मोहन दादा काळे,समर्थ जीवन काळे व सौ. कोमल मोरे (काळे) RTO, आंबेजोगाई यांचा मोलाचा सहभाग होता.त्यांच्या या तातडीच्या व निःस्वार्थी मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड