कळंब – लक्ष्मण ढोबळे यांनी बौद्ध समाजाची “लांडगा” अशी उपमा देऊन समाजाची अवहेलना केली आहे.हे विधान सामाजिक तेढ निर्माण करणारे,चुकीचे आणि निषेधार्ह असल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण ढोबळे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली. दरम्यान,महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे उपविभागीकरण करण्याचा घेतलेला निर्णयही चुकीचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निर्णयामुळे अनुसूचित जातीत सामाजिक सलोखा बिघडून परस्परांमध्ये वाद,कलह आणि फूट पडण्याचा धोका आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की – देशात २०११ नंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही.त्यामुळे शासनाकडे अनुसूचित जातीतील प्रत्येक जातीची नेमकी टक्केवारीची आकडेवारीच उपलब्ध नाही. या परिस्थितीत उपविभागीकरण करणे ही घाईगडबडीची व अन्यायकारक कृती आहे. उपविभागीकरण समितीत अनुसूचित जातीतील प्रत्येक जातीचा प्रतिनिधी असायला हवा, मात्र सद्यस्थितीत फक्त एका जातीचा प्रतिनिधी घेतल्याने समान न्याय होत नाही. वर्गीकरण केवळ शिक्षण व नोकरीपुरते न करता राजकीय प्रतिनिधीत्वातही करणे अत्यावश्यक आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत एका समाजालाच राजकीय आरक्षणाचा लाभ मिळतो आहे. आंबेडकरी समाजाची लोकसंख्या मोठी असूनही लोकसभा व विधानसभेत त्यांना न्याय्य प्रतिनिधीत्व मिळत नाही, हा सरळ अन्याय आहे. “जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही,तोपर्यंत कोणत्याही जातीला खरा न्याय मिळणार नाही. जात गणना न करता उपविभागीकरणाचा निर्णय घेऊ नये, अन्यथा रिपब्लिकन सेना तीव्र आंदोलन उभारेल,” असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी,कळंब यांच्या मार्फत देण्यात आले. यावेळी अनिल हजारे जिल्हाप्रमुख,रिपब्लिकन सेना धाराशिव, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल (मामा) समुद्रे,शिवसेनेचे डॉ.संजय कांबळे,डि.एम.चिलवंत, सोनटक्के,आप्पासाहेब हजारे, संकेत हजारे,सुरज वाघमारे आदींच्या सह्या या निवेदनावर आहेत.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव