कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथील विद्यार्थ्यांनी मानवी संवेदनांचा आदर्श घालून देत पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मदत निधी संकलित केला. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी “फुल नव्हे फुलाची पाकळी” या भावनेतून स्वतःच्या खाऊचे पैसे जमा करून शेतकरी राजाला मदतीचा हात दिला. संकलित झालेली रक्कम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात आली.हा निधी तहसील कार्यालयात तहसीलदार हेमंत ढोकले,उपविभागीय पोलीस अधिकारी पवार,पोलीस निरीक्षक अशोक चिंतले तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृतरीत्या जमा करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक महादेव खराटे, बलभीम राऊत, तुकाराम कराळे, शिवनंदा स्वामी तसेच स्वयंसेवक बापू हगारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमावेळी गावच्या सरपंच ज्योती वायसे,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अर्चना इंगळे, ग्राम महसूल अधिकारी अनिता भोसले यांच्यासह महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी राजाप्रती संवेदना निर्माण होऊन संकटकाळी सामाजिक भावनेतून मदत करण्याची जाणीव दृढ झाली. समाजकारणाची बीजे बालपणीच रुजली तर भविष्यात संवेदनशील नागरिक घडतील, हा संदेश या उपक्रमातून उमटला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी