March 26, 2026

कस्तुरीगंध पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा:तीन पिढ्यांचा संगम ठरला वैशिष्ट्यपूर्ण

  • कळंब – लेखिका सौ.अर्चना बावीकर लिखित ‘कस्तुरीगंध’ या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी साई मंगल कार्यालय,ढोकी रोड,कळंब येथे उत्साहात संपन्न झाला.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवि नरहिरे (चेअरमन,कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,कळंब) होते.उद्घाटनाचे मानकरी डॉ.भारत हांडीबाग (माजी अधिष्ठाता, मानव्य विद्याशाखा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर) होते.
    ग्रंथपर भाष्यकार म्हणून सौ. कमलताई बरुळे (माजी केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद शाळा,धानोरा,ता. अंबाजोगाई) यांनी पुस्तकातील आशयावर प्रकाश टाकला.
    यावेळी बंडोपंत दशरथ (माजी कोषाध्यक्ष,भगवंत मंदिर समिती, कळंब),डॉ.दत्ता साकोळे (ज्येष्ठ हिंदी साहित्यिक,शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब),डॉ. रामकृष्ण लोंढे (माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन),डॉ.वर्षा कस्तुरकर (महिला प्रमुख,सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश),उमेश कुलकर्णी (अध्यक्ष,जनकल्याण को-ऑपरेटिव्ह बँक लि.कळंब),करसन पटेल (उपाध्यक्ष,जनकल्याण को-ऑपरेटिव्ह बँक,कळंब)हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
    या कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती व डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
    प्रशांत धावारे व विशाल धावरे यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाला रंगत आणली.
    लेखिका सौ.अर्चना बावीकर यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वतःचा जीवनप्रवास,महाविद्यालयीन गुरूंच्या आठवणी आणि २५ वर्षांच्या समाजकार्याचा आढावा घेतला.त्यांच्या समाजकार्यावर आधारित विशेष चित्रफीतही दाखविण्यात आली.तसेच ‘कस्तुरीगंध’ हे शीर्षक निवडण्यामागील उद्देश त्यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केला.
    प्रितमयी पब्लिकेशनचे प्रकाशक प्रीतम वेदपाठक यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गपाट (प्राचार्य,देवधानोरा,ता.कळंब) यांनी केले,तर सौ.सविता बावीकर यांनी आभार मानले.
    विशेष म्हणजे या प्रकाशन सोहळ्यात लेखिका अर्चना बावीकर यांना घडवणारे त्यांचे दोन मराठी विषयाचे गुरू व सूत्रसंचालन करणारे त्यांचे मराठी विषयाचे शिष्य एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त तीन पिढ्यांचा झालेला हा संगम सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
    सर्व मान्यवरांनी ‘कस्तुरीगंध’ या ग्रंथाचे मनःपूर्वक कौतुक करताना बावीकर कुटुंबाच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव केला.
error: Content is protected !!