कळंब – ग्रामीण भागात जन्म घेऊन जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे सुर्डी (ता. केज) येथील सुपुत्र प्रा.राम चक्रधर कुपकर यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रतिष्ठेच्या SET परीक्षेत यश संपादन करून आपल्या गावी व परिसराला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे. सध्या ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करत भाटशिरपूरा येथील श्री गुरुकृपा बहुउद्देशी शैक्षणिक संस्था,पिंपळगाव (डोळा) संचलित भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेच्या वतीने प्रा.कुपकर यांना भविष्यातील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,चक्रधर कुपकर (मामा), सहशिक्षक एस.जी. सूर्यवंशी,एच.ए.पानढवळे,विनोद चाळक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ग्रामीण भागातून मोठ्या शहरात जाऊन स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होणे हे सोपे काम नाही. प्रा. कुपकर यांनी मिळवलेले यश हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थीही शैक्षणिक प्रगती साधावीत.” प्रा.कुपकर यांच्या यशामुळे सुर्डी व परिसरात अभिमानाची लाट उसळली आहे.त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या की, “त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन करावे व शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करावेत.” या गौरवामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून प्रा.कुपकर यांचे यश हे “जिद्दीसमोर अडथळे कधीच टिकत नाहीत” याचे जिवंत उदाहरण ठरले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड