February 9, 2026

हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची सरकारची घोषणा – मराठा समाजात आनंदोत्सव

  • कळंब – गेल्या पाच दिवसांपासून मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे यासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची मागणी घेऊन मुंबई येथील आझाद मैदानावर लाखो कार्यकर्त्यांसह ठिय्या देऊन उपोषण करत होते. दि.२ सप्टेंबर रोजी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता.
    याबाबत महाराष्ट्र शासनाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमिती स्थापन केली होती. या समितीने सखोल चर्चा करून उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.
    यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, “हैद्राबाद गॅझेट लागू करीत त्याविषयीचा शासन निर्णय (जीआर) हाती दिल्यासच उपोषण मागे घेऊ.” समितीतील मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत व माणिकराव कोकाटे यांनी त्यांना गॅझेट लागू करण्याविषयीचा अधिकृत शासन निर्णयाची प्रत सुपूर्द केली. तसेच सातारा व औंध गॅझेट लागू करण्याविषयीही सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
    या प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईक व आमदार राणा जगजीतसिंह पाटील उपस्थित होते. जीआर हाती मिळताच आझाद मैदानावर उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळून उत्स्फूर्त जल्लोष व्यक्त केला.
    या निर्णयाची घोषणा होताच कळंब शहरातील सकल मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले व गुलाल फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
error: Content is protected !!