धाराशिव ( जिमाका ) – गरीब व असुरक्षित कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या आरोग्य सेवांचा लाभ मिळावा,यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाचे असणारे आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. दि.२० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी लाकाळ,उपशिक्षणाधिकारी श्रीमती आर.सी.मैंदर्गी,डॉ.एस.एस.फुलारी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.ओंबासे पुढे म्हणाले,आयुष्यमान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी २७ जानेवारीपासून दोन आठवड्याचे जिल्हाभर शिबिराचे आयोजन करावे.ज्या आशा वर्कर यांनी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांना मदत केली,अशा आशा वर्कर्स यांना कामाचे देयक अदा करावे.ज्या सीएससी केंद्रातून हे कार्ड काढले तसेच खाजगी व्यक्तींनी हे कार्ड काढून देण्यास मदत केली आहे, त्यांची रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात यावी.शहरी भागात असलेल्या आपला दवाखान्याच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची कार्यवाही करावी,यासाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी व आपला दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांनी देखील आयुष्यमान भारत कार्ड काढावे.असे डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले. डॉ.घोष म्हणाले,आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आयोजित करण्यात येणारे शिबिरे यशस्वी करण्यात यावे.आयुष्यमान कार्ड काढण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरात ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी घेऊन यावे.आपले सरकार सेवा केंद्र,सामान्य सुविधा केंद्रामध्ये तसेच आयोजित शिबिरात जास्तीत जास्त लाभार्थीनी आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे नियोजन करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार,गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी कार्यक्रम आखून जास्तीत जास्त कार्ड काढावेत,असेही डॉ.घोष म्हणाले. २७ जानेवारीपासून जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी दोन आठवड्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही डॉ. हरिदास यांनी सांगितले. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र,सामान्य सुविधा केंद्र,आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत कार्ड मोफत काढून देण्यात येणार आहेत. आयुष्यमान कार्ड काढण्याची मोहीम जिल्ह्यात २७ जानेवारी २०२५ पासून १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.कर्मचारी हे गाव,वार्ड,वाडी, वस्ती, शाळा व महाविद्यालयामध्ये जावून आयुष्यमान कार्डचे ई-केवायसी करणार आहेत.तसेच लाभार्थ्यांना स्वतःचे ई-केवायसी स्वतः काढता यावे यासाठी आधुनिक मोबाईलमध्ये आयुष्यमान अँप डाउनलोड करून बेनिफिशरी बटनवर क्लिक करून ते स्वतःचे आयुष्यमान कार्ड काढू शकतात. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचे १०० टक्के आयुष्यमान कार्डचे ई-केवायसी मार्च २०२५ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.
आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून नागरिकांना प्रतिवर्षी पाच लाख रुपयापर्यंत मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येतात.या योजनेतून १३५६ हजारावर जिल्ह्यातील १८ खाजगी आणि १२ शासकीय अशा एकूण ३० रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रिया केले जातात. आत्तापर्यंत या योजनेतून जिल्ह्यातील ४६ कोटी रुपयांचे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी केले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड