August 8, 2025

जिल्ह्यातील 471 गावात राबविली जलद ताप व किटक शास्त्रीय सर्वेक्षण मोहिम

  • धाराशिव (जिमाका) – ताप,डेंग्यु व चिकुनगुनीया या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात वाढत आहे.या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी 23 ऑक्टोंबर रोजी सर्व अधिकारी,कर्मचारी यांची जिल्हास्तरावरुन व्हीडीओ कॉन्फरन्समार्फत बैठक घेऊन त्यामध्ये कार्यवाही करण्याच्या आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या.
    25 ऑक्टोंबर रोजी एकदिवशीय जलद ताप व किटक शास्त्रीय सर्वेक्षण धडक मोहीम राबविण्यात आली.या मोहीमेत वैद्यकीय अधिक्षक,तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणुन काम पाहीले.
    ही मोहीम ग्रामीण व शहरी भागातील 55 आरोग्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांमार्फत राबविण्यात आली.या मोहीमेअंतर्गत 471 गावांत जलद ताप व किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले.त्यामध्ये जिल्हयात एकुण 17 हजार 262 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 1 हजार 310 घरांमध्ये पाणी साठयामध्ये डास अळी आढळुन आली. त्यामध्ये एकुण 37 हजार 678 पाणी साठयाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 1 हजार 574 पाणी साठयामध्ये अळीवाढ आढळुन आली.या सर्वेक्षणांमध्ये संशयीत ताप रुग्ण 357 तसेच जिल्हयातील खाजगी रुग्णालयातील ताप रुग्ण 9 संशयीत डेंग्यु रुग्ण 17 आढळुन आले.
    या मोहीमेमध्ये डास अळी वाढ ताप रुग्ण व संशयीत डेंग्यु रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन कोरडा दिवस पाळणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे आणि ताप रुग्ण सर्वेक्षण अबेट कार्यवाही करणे तसेच घरांचे परिसरातील टायर्स / टयुब फुटकी भांडी इत्यादी रिकामे करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सर्व आरोग्य संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.
    तसेच जनतेस आरोग्य यंत्रणेमार्फत ताप रुग्ण व संशयीत डेग्यु चिकुनगुनीया रुग्ण निर्दशनास आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क करुन वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने उपचार घेण्यात यावा.ही मोहीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरीदास,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.मुल्ला व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.दिपक मेंढेकर याच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आली.
error: Content is protected !!