धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील युवा विकासाच्या कार्यात केलेल्या योगदानाची दखल घेऊन दरवर्षी युवकांना आणि युवकांच्या नोंदणीकृत संस्थांना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून क्रीडा विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप जिल्हास्तरावर दरवर्षी एक युवक आणि एक युवती तसेच एका नोंदणीकृत संस्था यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व १० हजार रुपये (प्रति युवक आणि युवती) आणि संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख ५० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी सन 2019-20 वर्षाकरिता संजय भुतेकर (थोडसरवाडी ता.जि. धाराशिव), सन 2020- 21 च्या पुरस्कारासाठी अनिल भोसले (मु.पो.गावसुद ता.जि.धाराशिव), सन 2021- 22 च्या पुरस्कारासाठी दीपक कारकर मु.पो.जवळा,ता.परंडा येथील दीपक कारकर आणि सन 2022 -23 च्या जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी अजिंक्य वराळे मु.मुळेवाडी पो.किनी ता.जि.धाराशिव यांची तर संस्थेचे जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन 2019-20 चा पुरस्कार नवयुवक क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुळेवाडी ता.जि.धाराशिव,सन 2020 -21 चा जिल्हास्तरीय युवा पुरस्कार लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था काटेवाडी ता. उमरगा आणि सन 2022-23 चा जिल्हास्तरीय युवा पुरस्कार वात्सल्य सामाजिक संस्था नळदुर्ग यांना पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील युवक/युवती व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सन 2019-20,सन 2020-21,सन 2021-22 आणि सन 2022 -23 या वर्षीचे जिल्हास्तरीय युवा पुरस्कार शासनाच्या निर्णयाद्वारे गठीत केलेल्या जिल्हास्तरीय निवड समितीने जाहीर केले आहे.या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे लातूरचे उपसंचालक तथा सहअध्यक्ष युवराज नाईक,समितीचे सदस्य राष्ट्रीय पुरस्कारार्थी डॉ. शुभम धुत,जिल्हा युवा पुरस्कारार्थी योगेश थोरबोले,नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सचिव श्रीकांत हरनाळे यांच्या समितीने जिल्हा युवा पुरस्काराची निवड केली आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील