धाराशिव (जिमाका) – पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आता ५ सप्टेंबर २०२४ करण्यात आली आहे.गणेशोत्सव मंडळांनी संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आय. डी. वर पाठवणे आवश्यक आहे. स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात.स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धा नि:शुल्क आहे. सांस्कृतिक कार्यक्रम,सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन,संस्कृतीचे जतन व संवर्धनाकरिता राबविण्यात आलेले उपक्रम,गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन,राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती,पर्यावरणपूरक सजावट,ध्वनिप्रदू्षण रहित वातावरण,गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.
७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील.राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख,२.५ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना रु. २५,०००/- रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान