August 9, 2025

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी यंत्रणांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

धाराशिव (जिमाका) – मुख्यमंत्री – माझी लाडके बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित,विधवा,घटस्फोटीत, परीतक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला ह्या योजनेसाठी पात्र आहेत.तेव्हा जिल्ह्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले.
10 जुलै रोजी जिल्हाधिकारी कक्षातून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांचा ” मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ” या योजनेचा आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी केदार अंकुश,नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्या महिला लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहे,त्याची नोंद ग्रामपंचायत व नगरपालिकेने रजिस्टरमध्ये नोंदवावी. लाभार्थी महिलांकडून हमीपत्र भरून घेऊन ते आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून अपलोड करावे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते,तशाच प्रकारची प्रक्रिया या योजनेच्या लाभासाठी करावी लागणार आहे.अर्जावर लाभार्थी महिलेने स्वतःचा फोटो लावला आहे का याची खात्री करावी.या योजनेच्या लाभासाठी 90 टक्के अर्ज हे ऑफलाईन असतील.योजनेसाठी ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात याव्यात.गावपातळीवर तलाठी व ग्रामसेवक हे या योजनेचे काम बघतील.योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिलेचे सर्व कागदपत्रे बघून तालुकास्तरीय समितीने त्याला मान्यता द्यावी.असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व अर्ज ग्रामपंचायत आणि नगरपालिका व नगरपंचायत येथे जमा करावे असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना,ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवकांना देखील या योजनेची माहिती द्यावी.त्यामुळे मोठ्या संख्येने महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील.अर्जावरील महिलेचे नाव हे आधारकार्डवर असलेल्या नावाप्रमाणेच नोंदवावे.यंत्रणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घ्यावे.जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी बचत गटांच्या महिलांची मदत घ्यावी.असे डॉ.ओंबासे यांनी यावेळी सुचविले.
योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भरून घेत असलेल्या अर्जासोबत हमीपत्रावर महिलेचे नाव आणि स्वाक्षरी असल्याची खात्री करावी असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचे अर्ज भरून घ्यावे.त्यामधून पात्र व अपात्र लाभार्थी निश्चित करावे. लाभार्थी महिलेचे बँक खाते क्रमांक हा आधार लिंक असावा.
डॉ.घोष म्हणाले,ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी एकही महिला ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची तालुकास्तरीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी.जास्तीत जास्त ठिकाणी या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे.असे त्यांनी यावेळी सांगितले.
दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित या आढावा सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी व सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.संबंधित अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने किती अर्ज भरून घेण्यात आले आहे,तसेच जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी आढावा सभेत दिली.

error: Content is protected !!