February 8, 2026

मुखवटे

  • तमाशा,नाटक,सिनेमा, स्टेजवरचा राजा तो राजा नसतोच मुळीच. त्या पात्रात उभे राहून तो त्याचं पात्र वटवीत असतो. सजवित असतो.फुलवीत असतो. रिझवीत असतो.तोही एक मुखवटाच असतो.
    आलेल्या प्रेक्षकांना आनंद देत असतात.सत्यात हे काही वेगळेच असतात.दुःख दारिद्र्य,पाठीवर टांगून कदाचित तेही पिढीत असतात. रोजी रोटी मिळविण्यासाठी,जगण्यासाठी ते बदलत असतात रोज वेगवेगळे मुखवटे.
    पडद्यावरचे मुखवटे आणि पडद्यामागचे मुखवटे खूप काही सांगून जातात. त्यांचं दुःख, त्यांचं दारिद्र्य शोधायचे असते कोणाला?.आपण पैसे फेकून करमणूक करून घेतो.आणि एन्जॉय करून परत फिरतो. ते एन्जॉय करण्यासाठी येणारे,पाहणारे आणि परत फिरणारे मुखवटे ते रोज तेवढेच आनंदीत असतात असे नाही.
    खरंतर इथे मुखवट्याशिवाय एकही माणूस जगत नाही.
    कुटुंबात, गावगाड्यात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात जिथे जाल तिथे प्रत्येकाचे मुखवटे, त्याचे रंग, त्याचे ढंग काही वेगळेच असतात. स्वतःला मदत हवी आहे म्हणून गरिबांचे दुःख वेशेला टांगून निधी मिळवणारे मुखवटे, मी पक्षाशी किती एकनिष्ठ आहे हे दाखविनारे, नेत्याचे होल्डिंग लावणारे, डॉल्बीवर धुंद होऊन नाचणारे मुखवटे तेही वेगळेच असतात. पदाच्या, प्रॉपर्टीच्या, प्रतिष्ठेसाठी हापापलेले, रोज झेंडे आणि झेंड्याचे रंग बदलणारे तेही मुखवटेच असतात.
    नात्यातील धार्मिक कार्यक्रम,कौटुंबिक कार्यक्रम, लग्न, वाढदिवस, गण गोत्रातील आनंद देणारे सर्वच कार्यक्रम. या कार्यक्रमाला येणारे, सहभागी होणारे, कष्ट उचलणारे, सेवा करणारे,मदत करणारे कुणी कौतुक करणारे, कुणी गोडवा गाणारे,तर कोणी उणीवा शोधणारे, नाक डोळे मोडणारे,वेगळेपणा दाखविणारे, दुसऱ्याला उगीच कमीपणा बोलनारे, हिनवणारे, एका चढीत एक रंगीबेरंगी असतात सगळेच मुखवटे….
    दुःखाच्या समयी तेही येत असतात वेगवेगळी रूपे घेऊन. लोक काय म्हणतील!!!.आपल्या दुखत कोण येईल का!!! जावं लागतय म्हणून. बरं झालं गेला म्हणून. आनंद व्यक्त करत येणारेही महाभाद्दर असतात .कोणी उगीच रडण्याचा आवाज करणारे, चेहरे पाडून बसणारे, जणू त्यांनाच इतरांच्या पेक्षा जास्त दुःख झालं आहे, असे दाखवणारे. इतर वेळी एकदाही न बोलणारे, त्याचं कौतुक न करणारे,
    त्याचं नुकसान होऊ दे अशी रोज देवाला प्रार्थना करणारे.असेही मुखवटे जास्तीचे असतात… धार्मिक कार्यात साधू म्हणून बेकडा दैववाद मांडणारे, सोवळ नेसून कोवळ उचलणारे, संधी साधू मुखवट्यांनीचे अनेक प्रकार, अनेक रंग आणि ढंगात चालणारे समाजा भोवताली रोज नव्या पात्रात नवे रंग परिधान करून दिखावा करणारे असतात मुखवटे.
    *असतात काही, नाही असं नाही.* रक्ता-मासाचे, नात्याशिवाय, जाती शिवाय, धर्माशिवाय जीव लावणारे. प्रेम करणारे,आधार देणारे, पाटी-पोटी खंबीरपणे उभा राहणारे. कधी आई-वडिलांच्या पात्रात. कधी भावंडाच्या पात्रात. कधी ईश्वराच्या पात्रात. उभा राहतात मग आधारवड बनून अनंत काळासाठी. त्यांचीच नोंद होते मग इतिहासाच्या पानावरती. त्यांचे गोडवे गायले जातात. लेख, गाणे, कथा, कवीता, पोवाडे, सिनेमा चित्रपटाच्या माध्यमातून. कधी कधी देवालयामध्येही देव म्हणून पूजले जातात. काळ्या कभिन्न कठीण खडकावरती शिलालेख म्हणून तर तर कधी चित्ररूपानेही.
    *असेच असतात फक्त तुमचे.आणि तुम्हीही त्यांच्यासाठी* पुन्हा जगण्याची, दुःखातून सावरण्याची उमेद निर्माण करत असतात. असे काही मुखवट्याशिवाय तुमच्या आमच्या सोबत सर्वांसोबत अखंड शीतल चांदणे घेऊन.रिमझिम येणाऱ्या पावसासारखे.झुळझुळ वाहणाऱ्या निरंतर अखंडित झऱ्यासारखे म्हणून अशा माणसातल्या देवासोबत मैत्री करा. त्यांचं जतन करा. त्यांना मुखवट्यात जाऊ देऊ नका.आणि त्यांच्या आयुष्यात तुम्हीही मुखवटे परिधान करू नका. निखळ मैत्रीच्या नात्याला कोणत्याच मुखवट्याचा साज घालू नका. नाहीतर तुमच्याही एक दिवस मुखवटा होऊन जाईल. कधी तमाशातल्या, नाटकातल्या, सिनेमातल्या जोकरासारखा…….
  • लेखक – भूमिपुत्र वाघ
error: Content is protected !!