February 11, 2026

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतला आढावा

  • धाराशिव (जिमाका) – राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ. गोविंद काळे व डॉ.मारुती शिकारे यांनी 13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जात प्रमाणपत्र,जात पडताळणी प्रमाणपत्र व जिल्ह्यातील आश्रमशाळांचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त बलभीम शिंदे व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • प्रा.डॉ.काळे यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या काही जणांना अद्यापही प्रमाणपत्र दिले जात नसल्याची बाब नागरिकांनी आपल्या निदर्शनास आणून दिली आहे.तरी संबंधितांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देखील तातडीने वितरित करावे.
  • प्रा.डॉ.काळे पुढे म्हणाले की, प्रत्येकासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जात पडताळणी प्रमाणपत्र प्राधान्य द्यावे. यावेळी सदस्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने किती पडताळणी प्रमाणपत्र दिले व किती प्रमाणपत्र देणे प्रलंबित आहे याचा देखील आढावा घेतला.
  • जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी यावेळी सांगितले की,ज्या गावांमध्ये मराठा- कुणबी नोंदी आढळल्या,त्या नोंदीचे ग्रामसभेत वाचन केल्याची माहिती यावेळी सदस्यांना दिली.
  • धाराशिव उपविभागीय अधिकारी श्री.डव्हळे यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या नागरिकांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू असून धाराशिव उपविभागाअंतर्गत आतापर्यंत 2582 प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
  • जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त श्री.शिंदे यांनी आतापर्यंत समितीकडून विशेष मागासवर्ग,विमुक्त जाती भटक्या जमाती,अनुसूचित जाती व इतर मागासवर्गांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून किती जणांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच समिती तीन महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्रांचे प्रकरणे निकाली काढले जातात.केवळ पुराव्याअभावी प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने पडताळणी प्रमाणपत्र देण्यास विलंब होतो.शैक्षणिक प्रकरणात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
  • जिल्हयातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांची माहिती तसेच जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांची भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती देखील सहायक आयुक्त श्री. अरवत यांनी दिली.
  • जिल्ह्यात किती कुणबी,मराठा -कुणबी व कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र वितरित केले ही माहिती यावेळी श्रीमती जाधव यांनी दिली. धाराशिव उपविभागात 1 जून 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत कुणबी जात प्रवर्गाची 1839 प्रस्ताव प्राप्त झाले.त्यापैकी 1814 मंजूर करण्यात आले.मराठा- कुणबी जात वर्गाचे 347 प्रस्ताव प्राप्त होऊन 304 प्रस्ताव मंजूर करण्यात आले.कुणबी- मराठाचे 2155 प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी 2053 मंजूर करण्यात आले. असे तिन्ही जात प्रवर्गाचे 4341 प्रस्ताव प्राप्त होऊन 4171 प्रस्ताव मंजुर करण्यात आले.
  • भूम उपविभागात कुणबी जातीची 726 प्रकरणे वरील कालावधीत प्राप्त होऊन सर्वच प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.तर मराठा -कुणबी जात प्रवर्गाची 54 प्रस्ताव प्राप्त झाले व 54 ही मंजूर झाले.कुणबी- मराठाची 5 प्रस्ताव प्राप्त होऊन पाचही प्रस्ताव मंजूर झाले.अशी एकूण 785 प्रस्ताव प्राप्त होऊन 785 प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
  • उमरगा उपविभागात कुणबी,मराठा – कुणबी जात प्रमाणपत्राची प्रकरणे निरंक असून कुणबी – मराठाची 229 प्रकरणे प्राप्त होऊन 229 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

    कळंब उपविभागात कुणबी जातीची 2892 प्रकरणे प्राप्त होऊन 2892 प्रकरणे मंजूर करण्यात आले.मराठा- कुणबी समाजाची 87 पैकी 87 प्रस्ताव मंजूर करण्यात आली तर कुणबी-मराठाची 717 प्रकरणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.एकूण 3696 प्रस्ताव प्राप्त झाले त्यापैकी 3696 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

  • जिल्ह्यात एकूण कुणबी,मराठा – कुणबी आणि कुणबी – मराठा अशी एकूण 9051 जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव प्राप्त होऊन 8881 प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 170 प्रस्ताव नामांजूर करण्यात आले.जिल्ह्यात वरील कालावधीत 8881 जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
  • जिल्ह्यात इतर मागासवर्ग,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती, कुणबी,मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या जात प्रवर्गात वितरित केलेल्या जात प्रमाणपत्राची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
  • 1 जून 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत जिल्ह्यातील चार उपविभागाअंतर्गत इतर मागास प्रवर्गाच्या 5445,विशेष मागास प्रवर्गाच्या 500, विमुक्त जातीच्या 1320,भटक्या जमातीच्या 3865, कुणबी जातीची 5432,मराठा- कुणबी जात प्रवर्गाच्या 3444 आणि कुणबी- मराठा जातीची 5 जात प्रमाणपत्रे अशी एकूण 19 हजार 811 जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आल्याची माहिती श्रीमती जाधव यांनी यावेळी दिली.
  • सभेला समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी जयश्री सोनवणे,धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजय डव्हळे,कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील, उमरगाचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यावेळी उपस्थित होते.प्रस्ताविक व उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी मानले.
error: Content is protected !!