शिराढोण – ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना चांगली असली तरी ती फक्त सोशल मीडियावरच राहता कामा नये तर प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्यासाठीची जबाबदारी घेण्याची गरज आहे. तरच भविष्यात निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल. तसेच येणारी पिढी देखील मोकळा श्वास घेऊ शकेल.
मागील काही दिवसापासून देशभरातील अनेक भागांत आणि जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४५अंशांपर्यंत गेला होता. दिल्लीमध्ये तर ५२ अंशांपर्यंत पोचला होता. परिणामी जनजीवन विस्कळित झाले. मानवी जीवनावर परिणाम होत असून आता कुठेतरी झाडे लावण्याची गरज असल्याचे मेसेज सोशल मीडियावरती फिरू लागले आहेत. पर्यावरण वाचविण्यासाठी ते जरुरीचे आहे, मात्र प्रत्येकाने प्रत्यक्षात एक तरी झाड लावून ते जगविण्याची जबाबदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.वाढते शहरीकरण, रस्ते अशा अनेक कारणांमुळे झाडावर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्यामुळे झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्या तुलनेत झाडे लावून ते जगविण्याचे काम खूप कमी प्रमाणामध्ये होत आहे. याचे परिणाम म्हणून निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. या उन्हाळ्यात मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये ४५ अंशांपर्यंत उष्णतेचा पारा चढल्याने प्रचंड उकाडा निर्माण झाला आणि उष्णतेच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागल्या. मे महिन्यात तर दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडणेदेखील नागरिकांना मुश्किल झाले होते.
आज प्रत्येकजण सावलीसाठी झाड शोधतोय. मानवी जीवनात झाडाचे महत्त्व किती मोठे आहे. याची जाणीवच यंदाच्या उन्हाळ्याने करून दिली. निसर्गाचा ऱ्हास कराल तर घराबाहेर पडणे मुश्कील होईल, याची प्रचीतीच यंदा नागरिकांना आली. प्रत्येकाने एक झाड लावावे ते जगवावे, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. मात्र, सोशल मीडियावर कळवळा दाखवण्याऐवजी प्रत्येकाने पुढाकार घेऊन एक झाड लावून ते जगवण्याचे काम करण्याची जबाबदारी आजच आपल्या प्रत्येकाला घ्यावी लागेल, तरच येणारी पिढी मोकळा श्वास घेऊ शकेल.
जनजागृतीतून व्हावे वृक्षारोपण
■ प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करण्यात येते, मात्र सरकारची ही योजना फोल ठरते. सर्वाधिक वृक्षतोड ही रस्ते रुंदीकरण करताना होते मात्र संबंधित विभाग त्या ठिकाणी ठिकाणी वृक्षलागवड करण्याकडे दुर्लक्ष करतो. वृक्षतोड होत असताना कारवाई होत नसल्याने परिणामी झाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. प्रशासन दरवर्षी विविध विभागांच्या माध्यमातून गावोगावी वृक्षलागवडीचे अभियान राबवते. मात्र, ते जगविण्याची जबाबदारी शासन घेत नसल्याने झाडे जळून जातात. झाडे लागवडीसाठी केलेला लाखो रुपयांचा निधी वाया जातो.
निसर्ग फुलविण्याची गरज
■ विविध कार्यक्रमांतून झाडे लागवडीचे महत्त्व वाढविण्याची गरज आहे. वाढदिवस, पुण्यतिथी, विवाह सोहळा, सत्कार समारंभ, जयंती, वर्धापन दिन अशा विविध कार्यक्रमात झाडे लागवडीसाठी आता प्रत्येकाने पुढाकार घेऊन हे अभियान गतिमान करून आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काही प्रमाणात हे काम केले जात जात आहे. याचा आदर्श प्रत्येकाने घेऊन निसर्ग फुलविण्याची गरज आहे.
More Stories
‘दैनिक लोकमत’ समूहातर्फे शिराढोण येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न आला.
खर्च वाचला तर आत्महत्या थांबतील – सत्यपाल महाराज
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर