August 9, 2025

मशाल पेटणार की घड्याळाची टिकटिक ऐकू येणार

  • कळंब (माधवसिंग राजपूत) – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दिनांक ७ मे २०२४ रोजी मतदान संपन्न झाले. याचा निकाल आज जाहीर होत असून ईव्हीएम मध्ये बंद झालेल्या मतदानाची मोजणी होत असून मशाल येणार की घड्याळ याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर,उमरगा,परांडा,व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
    मतदारसंघातील 19 लक्ष 92 हजार 737 मतदारापैकी 12 लक्ष 32 हजार 969 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला एकूण 63 .88 टक्के मतदान झाले.2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेना युतीला राज्यातबहुमत मिळाले होते. यानंतर झालेल्या राजकीय उलथा पालथीत शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले त्यानंतर पुन्हा दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली व एकनाथ शिंदे व नंतर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात भाजप सह महायुती सरकार सत्तेत आहे.या पक्ष फुटीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शिवसेना उबठा आपली निष्ठा कायम ठेवली आणि त्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर महायुती मध्ये जागा कुणाला सुटणार याचा तिढा बऱ्याच दिवस राहिला व शेवटी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या गटाला सोडण्यात आली परंतु उमेदवार देत असताना तुळजापूर मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पती भारतीय जनता पक्षात व पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारी यावर मतदारसंघात भरपूर चर्चा झाली तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपली उमेदवारी निश्चित समजून मतदार संघ वैयक्तिक भेटीगाठी घेऊन व मतदार संघ पिंजून काढला.त्यांच्या साथीला उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेना उबठा पक्षाचे एकमेव आमदार कैलास घाडगे पाटील हे राहिले तर महायुतीकडे औसा मतदार संघातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार त्यांचे विरोधक उमेदवार राहिलेले बसवराज पाटील ,उमरगा मतदार संघातील विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड ,तुळजापूर मतदारसंघातील भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील , परांडा -भूम- वाशी मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत बार्शी मतदारसंघातील अपक्ष आमदार राजाभाऊ राऊत विधान परिषदेचे शिक्षक आमदार विक्रम काळे ,पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण अशी तगडी फळी होती. विद्यमान खासदार ओमप्रकाश राज निंबाळकर यांच्यासाठी पक्ष निष्ठा, मराठा आरक्षण तसेच शेतीमालाचे भाव ,महागाई हे मुद्दे लावून धरले तर महायुतीकडून मतदारसंघाचा विकास डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलेला जिल्ह्याचा विकास तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेली देशाची प्रगती, अयोध्या राममंदिर उभारणी ,शेतकऱ्यासाठी पिक विमा तसेच कृष्णा खोऱ्यातील पाणी हे मुद्दे मांडले व संघटित रित्या शेवटच्या काही दिवसात महायुती मध्ये असलेली नाराजी दूर करून मतदान खेचून आणण्यासाठी प्रयत्न झाले. यात महायुती किती यशस्वी झाली यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. एक्झिट पोल व राजकीय विश्लेषकांनी उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेना उबठा उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयी होतील असे भाकीत केली आहे तर दुसरीकडे महायुतीतील या आमदारांची ताकद विजय मिळवून देईल असा विश्वास आहे. संपर्क किती प्रभावी ठरला आहे एकंदरीत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली आहे.
error: Content is protected !!