कळंब – राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मराठवाडा युवकाध्यक्षपदी विकास कदम यांची दि.10 डिसेंबर रोजी धाराशिव येथे सर्वानुमते निवड करण्यात आली.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्य प्रवक्ते रोहिदास बनसोडे, मराठवाडा अध्यक्ष गोपाळ बच्छीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर निवड जत्रा फंक्शन हॉल धाराशिव येथे पार पडली.
या निवडीबद्दल समाज बांधव, मित्रपरिवार व विविध स्तरातून विकास कदम यांचे अभिनंदन होत आहे. गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विकास कदम यांनी युवक जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारीपूर्वक काम पाहिले. या काळात त्यांनी कळंब या ठिकाणी श्री. संत रविदास महाराज यांच्या मंदिरासाठी नगर परिषद यांच्याकडून जागा उपलब्ध करून संत गुरु रविदास महाराज मंदिराची उभारणी केली आहे. त्याचप्रमाणे चर्मकार समाजाचा जिल्हा मेळावा व समाजामध्ये विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विवीध कार्यक्रम त्यांच्या काळात पार पाडले. सध्या मराठवाडा नेता या दैनिकाचे कळंब तालुका प्रतिनिधी म्हणून काम देखील करत आहेत. चर्मकार समाजातील गोरगरिबांना शैक्षणिक मदत याचबरोबर कोरोना काळामध्ये चर्मकार समाजातील लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक किट वाटप करण्याचा उपक्रम राबवला. या सर्व कामाची पावती म्हणूनच त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय राजर्षी शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार 2022 देऊन गौरवण्यात आले. कोरोना काळामध्ये देखील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.गेली तीन वर्षात त्यांनी संत गुरु रविदास महाराज घराघरात या उपक्रमांतर्गत संत रोहिदास महाराज यांच्या 2000 प्रतिमा समाज बांधवांना भेट दिल्या. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन व समाजाप्रती असलेली काम करण्याची तळमळ पाहून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री मा. बबनरावजी घोलप नाना यांच्या आदेशान्वये विकास कदम यांची मराठवाडा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर