April 24, 2026

‘मधुमित्र–मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज मागविले

  • मधमाशीपालकांना सुवर्णसंधी
  • धाराशिव (जिमाका ) – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने २०२६ साठी ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरू केली असून मधमाशीपालन व्यवसायाला चालना देणे व मधपाळांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
    मधमाशीपालन क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत राहून उल्लेखनीय यश मिळवलेल्या मधपाळांना या पुरस्कार योजनेअंतर्गत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे, यापैकी एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
    पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी रु.११,०००/-, द्वितीय क्रमांकासाठी रु.७,०००/- आणि तृतीय क्रमांकासाठी रु.५,०००/- अशी निश्चित करण्यात आली आहे.२० मे २०२६ रोजी ‘जागतिक मधमाशी दिना’चे औचित्य साधून पुणे येथे आयोजित जाहीर समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.इच्छुकांसाठी नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून, जिल्ह्यातील खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सुद्धा अर्ज उपलब्ध आहे.
    इच्छुकांनी आपले अर्ज ४ मे २०२६ पर्यंत जिल्हा कार्यालय येथे सादर करावे.अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय,धाराशिव (संपर्क क्र. ०२४७२-२२२३०१) तसेच संचालक,मध संचालनालय,महाबळेश्वर (फोन नं.०२१६८ -२६०२६४) यांच्याशी संपर्क साधावा.असे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ,धाराशिवच्या जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!