April 11, 2026

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

  • महसूल वसुलीत ११४.५७ टक्के उद्दिष्टपूर्ती
  • धाराशिव (जिमाका) – उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांनी आर्थिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये शासनाने दिलेल्या महसूल उद्दिष्टानुसार ११४.५७ टक्क्यांपेक्षा जास्त महसूल वसुली करत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून,या यशामुळे कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कालावधीत कार्यालयाने केलेल्या विविध कामगिरीचा आढावा पुढीलप्रमाणे आहे.आर्थिक वर्ष २०२५ -२६ मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांनी तब्बल १२६ कोटी ३० लाख रुपयांचा महसूल शासनास मिळवून दिला आहे.मागील वर्षीच्या ९७ कोटी ६२ लाख महसूल वसुलीच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष मेहनतीमुळे हे उद्दिष्ट साध्य झाले असून,शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ११४.५७ टक्के महसूल वसुली करण्यात यश आले आहे.
    महसूल प्राप्तीमध्ये वाहन नोंदणीचा मोठा वाटा असून वर्षभरात एकूण ३८ हजार ६२४ वाहनांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये २६ हजार ७०८ दुचाकी,३ हजार ६२७ चारचाकी,५१५ ऑटोरिक्षा,१ हजार ५४८ मालवाहू वाहने, २७९ प्रवासी वाहने तसेच इतर वाहनांचा समावेश आहे.तसेच आकर्षक पसंती क्रमांक शुल्काद्वारे २ हजार ५५३ वाहनधारकांकडून ३ कोटी १९ लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.
    कार्यालयातील वायुवेग पथकानेही प्रभावी कामगिरी करत १९ हजार ४७५ दोषी वाहनांवर कारवाई केली असून ४ कोटी ५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
    नवीन वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव आणि CSR Box या संस्थेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत व्हिडिओ दाखवून प्रशिक्षण दिले जाते.एप्रिल २०२२ ते मार्च २०२६ या कालावधीत एकूण ७ हजार ५४३ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले असून सुरक्षित रस्ते, सुरक्षित वाहने आणि सुरक्षित चालक घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
    रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान २०२६ अंतर्गत दिनांक १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत शहर व जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.पादचाऱ्यांमध्ये अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने ‘Walk on Right’ या संकल्पनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच ‘Good Samaritans’, ‘Use of Zebra Crossing’ आणि दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.
    शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियम,चिन्हे, हेल्मेट व सीटबेल्ट वापर,वेग नियंत्रण तसेच अपघातांची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट न वापरल्यास मृत्यूची शक्यता वाढते,याची जाणीव करून देत व्यापक जनजागृती करण्यात आली.
    याशिवाय,शिकाऊ अनुज्ञप्तीधारक, नागरिक तसेच ड्रायव्हिंग स्कूल चालक/मालक यांचेही प्रबोधन करण्यात आले.वाहनचालकांच्या आरोग्याचा अपघातांशी संबंध लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस,ट्रक, टेम्पो आणि रिक्षा चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी,आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
    हेल्मेट वापरास प्रोत्साहन देण्यासाठी बुलेट धारकांची हेल्मेट रॅली व ‘वॉकाथॉन’चे आयोजन करण्यात आले.तसेच सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी राष्ट्रीय महामार्गावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
    पोलीस विभाग,परिवहन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करून ‘Vulnerable Spots’ निश्चित करण्यात आले असून,त्या ठिकाणी तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
    या सर्व उपक्रमांमुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव हे महसूल वसुलीसह रस्ता सुरक्षा जनजागृतीतही आदर्श ठरत असल्याचे दिसून येत आहे.
error: Content is protected !!