April 5, 2026

बातमी डिलीट करण्यासाठी पत्रकाराला धमकी;कळंबमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • NCMC कार्ड गैरव्यवहार उघडकीस आणल्याचा राग; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई
    कळंब – NCMC (राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड) गैरव्यवहार प्रकरणी बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून कळंब येथील पत्रकार संदिप कोकाटे यांना बातमी डिलीट करण्यासाठी धमकावल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    राज्यात सुरू असलेल्या NCMC कार्ड वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कळंब आगारातही नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त अधिक रक्कम वसूल केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत पत्रकार संदिप कोकाटे यांनी ‘नमस्ते धाराशिव’ या समाजमाध्यमावरून बातमी प्रसिद्ध केली होती.
    ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित एजंटच्या आयडीवर सब-एजंट म्हणून कार्यरत असलेले संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी यांनी कोकाटे यांच्यावर बातमी डिलीट करण्यासाठी विविध माध्यमांतून दबाव टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भावनिक विनंती, त्यानंतर आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र कोकाटे यांनी यास न जुमानता प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला.
    यानंतर गुरुवार (ता. २) रोजी रात्री सुमारे ११ वाजता आरोपींनी कोकाटे यांच्या कार्यालयात जाऊन धमकी दिली. तसेच चौकात भेटून “बातमी डिलीट कर, नाहीतर परिणाम भोगावे लागतील”, “खोट्या गुन्ह्यात अडकवू” आणि “पैसे मागितल्याची बदनामी करू” अशा शब्दांत दबाव टाकण्यात आला.
    या प्रकरणी पत्रकार संदिप कोकाटे यांच्या फिर्यादीवरून संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी यांच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम 351(2), 3(5) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियम 3 व 5 अन्वये कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • “मला बातमी डिलीट करण्यासाठी संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून सातत्याने दबाव व धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच माझ्या प्रसार माध्यम संस्थेच्या व खासगी मालमत्तेचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.”
    — संदिप कोकाटे (संपादक, नमस्ते धाराशिव)
error: Content is protected !!