धाराशिव (जिमाका)– अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा (ॲट्रॉसिटी कायदा) अत्यंत महत्त्वपूर्ण असून जातीय अन्याय निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले हे प्रभावी पाऊल आहे.दर महिन्याला जिल्हा दक्षता समितीच्या नियमित बैठका घेऊन बाधितांना आर्थिक व न्यायालयीन मदत करण्यात येते.त्यामुळे या कायद्यांतर्गत अत्याचार पीडितांना तातडीने मदतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. दि.३१ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय धाराशिव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ॲट्रॉसिटी प्रकरणांतील मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय/निमशासकीय सेवेत नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात धाराशिवचा आंतरराष्ट्रीय दिव्यांग नेमबाज चेतन सपकाळ याचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पुजार होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, राजाभाऊ ओहोळ, विद्यानंद बनसोडे,महादेव वाघमारे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुजार पुढे म्हणाले की,चेतन सपकाळ हा जिल्ह्याचा अभिमान असून त्याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे.अनेक खेळाडूंना तो प्रेरणादायी ठरत असून त्याच्या आदर्शातून इतरांनीही प्रगतीची दिशा घ्यावी.तसेच ॲट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृती सुरू असून नियुक्ती आदेश मिळालेल्या वारसांनी शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करावे,असे आवाहन त्यांनी केले. श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर म्हणाल्या की,अशा उपक्रमांमुळे सामाजिक विकासाला गती मिळत आहे.अत्याचार पीडितांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे ही महत्त्वाची बाब आहे.चेतन सपकाळच्या यशामागे त्याच्या आईचे योगदान मोठे असून त्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते चेतन सपकाळ याचा त्याच्या आई – वडिलांसह भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत,प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.तसेच नियुक्ती आदेश प्राप्त उमेदवारांनाही भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत, नियुक्ती आदेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले,संचालन समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप यांनी केले.उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने यांनी मानले.कार्यक्रमाला नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांसह त्यांच्या नातेवाईकांची व समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.२० नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ (सुधारित २०१५)अंतर्गत खून अथवा अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय किंवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण २६ प्रकरणांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी २० प्रकरणे अनुसूचित जाती तर ६ प्रकरणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. सन २०१२ पासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणांपैकी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या १८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत १५ प्रकरणे (अनुसूचित जाती १२ व अनुसूचित जमाती ३) मंजुरीसाठी सादर करण्यात आली होती.या प्रस्तावांपैकी अनुसूचित जातीच्या १२ प्रकरणांना समाज कल्याण आयुक्त,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी नियुक्तीसाठी मंजुरी दिली आहे.त्यामधील ३ प्रकरणांमध्ये वारसांवर गुन्हे दाखल असल्याने प्रक्रिया प्रलंबित आहे,तर एका प्रकरणात बीड येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उर्वरित ७ पात्र वारसांना नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले. दरम्यान,काही प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित आहे.२ प्रकरणे प्रतीक्षासूचीत,६ प्रकरणांत शेतजमिनीची मागणी,१ अनुकंपा तत्वावरील नियुक्ती,१ प्रकरणात कायदेशीर वारस प्रमाणपत्राचा अभाव आणि १ प्रकरणात आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ (सुधारित अधिनियम २०१५) अंतर्गत पात्र वारसांना देण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये महादेव संदिपान वाघमारे (मु.पो. पारा,ता.वाशी) यांची जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच श्री.अक्षय गौतम गंगावणे (सिद्धार्थनगर,सांजा रोड,धाराशिव) यांची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धाराशिव येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती झाली आहे. श्री.अक्षय सहदेव मस्के (जवळगा (मेसाई), ता.तुळजापूर) यांची अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, मुरूम (ता. उमरगा) येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.याचप्रमाणे श्रीमती दिपाली चंद्रकांत गायकवाड/दिपाली जयकुमार शेलार (कासारवाडी,पुणे) यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,परंडा येथे शिपाई (गट-ड) पदावर नियुक्ती झाली आहे.श्री.समाधान सहदेव कठारे (सारोळा बु.,ता.धाराशिव) यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,कळंब येथे पहारेकरी (गट-ड) पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.तसेच श्रीमती पूजा शहाजी मस्के(व्हनाळा,ता. तुळजापूर)यांची मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,तुळजापूर येथे सफाईगार (गट-ड) पदावर नियुक्ती झाली असून श्री.रुकेश बाळासाहेब सरवदे (भिकारसारोळा,ता.धाराशिव) यांची मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,उमरगा येथे पहारेकरी (गट-ड) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक राहून काटकर,कपिल थोरात,अमोल काटांगळे,कार्यालय अधीक्षक श्रीमती.सुरेखा गवळी व बिभीषण शिरसाट यांनी परिश्रम घेतले.
More Stories
कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती