March 28, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

  • धाराशिव (जिमाका)– प्रियंवदा महाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव यांच्या स्वाक्षरीने २७ मार्च रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले.भारतीय प्रशासकीय सेवेत २०२२ मध्ये देशात १३ वा आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या श्रीमती.महाडदळकर यांनी मुंबई येथील व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून,त्यानंतर बेंगळुरू येथील आयआयएममधून फायनान्स विषयात एमबीए पदवी संपादन केली आहे.शैक्षणिकदृष्ट्या भक्कम पायाभूत तयारीनंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.
    प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातच त्यांनी परिविक्षाधीन काळात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना स्थानिक प्रशासन,ग्रामीण विकास व विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे अर्थ मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम पाहिले.
    यानंतर अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून त्यांनी कार्य करत आदिवासी व दुर्गम भागातील विकासकामांना गती दिली.स्थानिक समस्यांचे निराकरण,शासकीय योजनांचा प्रभावी लाभ आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
    आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीमती.महाडदळकर यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण विकास,पायाभूत सुविधा,शिक्षण,आरोग्य आणि सामाजिक कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
error: Content is protected !!