कळंब ( माधवसिंग राजपूत) – शिव सेवा तालीम संघ, कळंब आयोजित भव्य शिवजयंती महोत्सवाची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या दमदार ‘शाहीर महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाने उत्साहात झाली. शिवचरित्र पोवाडे आणि स्फूर्ती गीतांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,पत्रकार सतीश टोणगे,दिलीप गंभीरे,शितल घोंगडे,मुस्तान मिर्झा,परमेश्वर पालकर,प्राचार्य जगदीश गवळी, माधवसिंग राजपूत,मंगेश यादव, प्रदीप यादव,शिवप्रसाद बियाणी, शिवाजी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपूजनाने तसेच राजमाता जिजाऊ व महामानवांच्या प्रतिमापूजनाने झाली.कुमारी सई बाकले हिने जिजाऊ वंदना सादर केली.प्रास्ताविक सुशीलकुमार तीर्थकर (अध्यक्ष, शिव सेवा तालीम संघ) यांनी केले. शिवशाहीर संतोष साळुंखे यांनी आपल्या पहाडी आवाजात शिवचरित्र जिवंत केले.“गरजा जय जय महाराष्ट्र माझा”, “वाजवा संबळ, हलगी शिवरायांची पालखी आली” ही गीते प्रथमच कळंब येथे सादर करत पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देत डॉल्बी-डीजे टाळण्याचा संदेश दिला. शिवजन्माचा पोवाडा, “किल्ले रायगड महाराष्ट्राची शान” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण दणाणून गेले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट यांनी केले. शिवजयंती महोत्सवानिमित्त पुढील कार्यक्रमांची रेलचेल असून १६ फेब्रुवारी रोजी व्याख्याते प्रदीप साळुंखे यांचे “मन करा रे प्रसन्न” या विषयावर व्याख्यान, १७ फेब्रुवारी रोजी विशाल गरड यांचे “शिवचरित्रातून महिला सबलीकरण” या विषयावर मार्गदर्शन,तर १८ फेब्रुवारी रोजी संस्कृती महाराष्ट्राची पुणे यांचा अस्सल मराठी लोकसंगीत व लोकनृत्याचा विशेष कार्यक्रम होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त सकाळी ११.३० वाजता देवी मंदिर, कळंब येथून भव्य मिरवणूक व महिलांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या महोत्सवाचे संयोजक अतुल कवडे,रोहन पारख,अमर चाऊस, पूजा धोकटे व संजय घुले हे आहेत.
More Stories
श्वासाइतकेच ध्येयाला महत्त्व द्या – परमेश्वर पालकर
पानगावात लाखोंचे अफू पीक जप्त
आदर्श इंग्लिश स्कूलचे रंगतदार स्नेहसंमेलन