धाराशिव ( जिमाका ) – राज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे,राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून, रोजगार स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी, तसेच उद्योगाच्या विकासासाठी राज्य, तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग,त्यांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवित आहेत. या योजनांची माहिती उद्योजकांना एकाच वेळी उपलब्ध होण्यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने धाराशिव येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उद्योजकांना या कार्यशाळेमार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांच्या माहितीचा लाभ घेऊन आपले उद्योग सुरू करावे आणि जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपले सरासरी उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले. तसेच या कार्यशाळेस छ.संभाजीनगरचे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते यांनी उद्योग विभागाच्या सर्व योजनांची माहिती दिली. यामध्ये मैत्री कायदा, CMEGP, PMEGP, क्लस्टर, पायाभूत सुविधा योजना, सामूहिक प्रोत्साहन योजना, SMS, DIC LOAN योजना आदी योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार सुरू करावा असे आवाहन केले. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सिडबी, अपेडा, ओएनडीसी, डीजीएफटी, ई ॲण्ड वाय कन्सलटंसी यांचे प्रतिनिधी व बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक यांनी CGTMSE बाबत माहिती दिली. यावेळी सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे, तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातसंबंधी कामकाज करणारे घटक यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचा समारोप प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी