September 21, 2026

बाल आनंद मेळाव्यातून कष्टाची कमाई;जिल्हा परिषद प्रशाला कळंब येथील विद्यार्थ्यांचा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारा उपक्रम”

  • कळंब – येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांचे येथे दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाखेरखा पठाण व उपाध्यक्ष श्रीमती प्रिया लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या बाल आनंद मेळाव्यात शाळेतील प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेनुसार स्वतःचे स्टॉल उभारले होते.या स्टॉलमध्ये खाद्यपदार्थ,हस्तकला वस्तू, शैक्षणिक साहित्य,सजावटीच्या वस्तू तसेच दैनंदिन वापराच्या साहित्याची विक्री करण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्टॉलची मांडणी,किंमत ठरविणे, विक्री व हिशेब ठेवणे हे सर्व काम स्वतःकेल्याने त्यांना व्यवहारज्ञान, नियोजन कौशल्य व कष्टाचे मोल प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
    मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक पदार्थ तयार करून विक्री केली तर काहींनी नाविन्यपूर्ण कल्पनांमधून आकर्षक वस्तू सादर केल्या.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक वृत्ती,आत्मविश्वास व सहकार्याची भावना निर्माण झाली.
    शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवावेत,असे मत व्यक्त केले. मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
    बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकत-शिकत आनंद घेण्याची संधी मिळाली असून हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित पालक व नागरिकांनी व्यक्त केली.
error: Content is protected !!