धाराशिव (जिमाका)- येत्या ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.जिल्ह्यात या निवडणुकीदरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही,याची दक्षता घ्यावी.निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना श्री.पुजार बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,सहाय्यक जिल्हाधिकारी रवैयाह डोंगरे,जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर,संतोष राऊत,श्रीमती.अरुणा गायकवाड,श्रीकांत पाटील,उपविभागीय अधिकारी सर्वश्री.ओंकार देशमुख,दत्तू शेवाळे,गणेश शिंदे,उपविभागीय पोलीस अधिकारी सर्वश्री संजय पवार,अनिल चोरमले,सुरेश राऊत, अरविंद शेलार,जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ यांची सभागृहात तर सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची ऑनलाईन उपस्थिती होती. पुजार म्हणाले की,अनधिकृत बॅनर व जाहिरात फलक काढण्यात यावे.शहरी भागात बॅनर लावण्यात येत असतील तर त्याची पूर्व परवानगी नगरपरिषदेकडून घेण्यात यावी.निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही,याची दक्षता घ्यावी.विविध राजकीय पक्षांना प्रचारासाठी वेगवेगळ्या परवानग्या घेण्याबाबतचे कळवावे.प्रत्येक मतदान केंद्राला निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे भेट देऊन पाहणी करून मतदान केंद्रावरील त्रुटी दूर कराव्यात.तडीपारची प्रकरणे तातडीने सादर करून त्यावर त्वरित कारवाई करावी.असे पुजार यावेळी म्हणाले. स्थिर पथके,भरारी पथके,चित्रीकरण करणारी पथके व चित्रीकरणाची बारकाईने निरीक्षण करणाऱ्या पथकांनी प्रभावीपणे आपली कामे करावी असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे.ही बाब लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. उशिरापर्यंत ज्या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे अशा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त व प्रकाशव्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.दर दिवशी सायंकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूकविषयक कामकाजाची तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाही बाबतची माहिती द्यावी.ही माहिती दोघांनीही माध्यमांना नियमितपणे द्यावी.सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही तसेच निवडणूक काळात कोणालाही उपोषणाला बसता येणार नाही.पोलीस बंदोबस्ताकरिता आवश्यक असलेली वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.असे पूजार म्हणाले. श्रीमती खोखर म्हणाल्या की,निवडणूक काळात पोलिसांकडे असलेल्या जबाबदारीची माहिती त्यांना आहे.उमेदवार व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या प्रचारार्थ देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या निःपक्षपातीपणे देण्यात याव्या. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावे.शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.पोस्टर्स व बॅनर्स परवानगी घेऊनच लावले आहेत का याची खात्री करावी.अन्यथा संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करावे असे श्रीमती खोखर म्हणाल्या. निवडणूक काळात विविध पथके तैनात राहणार असल्याचे सांगून श्रीमती खोखर म्हणाल्या,प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात.तडीपारीची कारवाई प्राधान्याने करावी.कोणताही आरोपी किंवा संशयित व्यक्ती निवडणूक काळात काही अप्रिय घटना घडविण्याची शक्यता असल्याचे लक्षात आल्यास त्याच्यावर तातडीने कारवाई करावी.अवैध शस्त्र जप्तीची कारवाई करण्यात यावी.परवाना असलेली शस्त्रे जमा करून घ्यावी.असे श्रीमती.खोखर यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असलेल्या विविध कलमांची तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली व काही सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान