कळंब – शिवसेना नेते तथा प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले अजित पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब शहरात दि.२ जानेवारी २०२६ रोजी भव्य शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या शेकडो युवकांनी अजित पिंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून,या निमित्ताने शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली आहे. नव्या युवकांच्या सहभागामुळे तालुका पातळीवर शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.
या कार्यक्रमास धाराशिव जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी आमदार राजन साळवी,माजी खासदार रवींद्र गायकवाड,संपर्क प्रमुख ज्ञानराज चौगुले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी (आप्पा) कापसे, जिल्हाप्रमुख मोहन पन्नूरे, उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उमरगा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण गायकवाड आणि कळंब नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याचबरोबर कळंब व उमरगा नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत या कार्यक्रमात गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून महिलांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणातून अजित पिंगळे यांच्या नेतृत्वगुणांचा व संघटन कौशल्याचा गौरव करत, जिल्हा पातळीवर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवावी अशी मागणीही व्यक्त केली. आपल्या प्रत्युत्तरात अजित पिंगळे यांनी पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत करत,शिवसेना ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी चळवळ असल्याचे सांगितले.आगामी काळात तालुक्याच्या विकासासाठी, युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या भव्य मेळाव्यास तालुक्यातील विविध गावांमधून शेकडो युवक, शिवसैनिक,पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन