आज आद्य समाजसुधारक संत गाडगेबाबा म्हणजेच डेबुजी झिंगराजी जानोरकर यांची ६९ वी पुण्यतिथी. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेणगाव जि. अमरावती येथे झाला. महाराष्ट्र संत सज्जन, महंत आणि वारकऱ्यांची पावन भूमी म्हणून ओळखली जाते. त्यांनी सामाजिक अज्ञान, दारिद्र्य, अनिष्ट, प्रथा परंपरा,चालीरीती आणि अंधश्रद्धा पाहून लोकसेवा लोकशिक्षणाचे अखंड कार्य केले.अंगावर चिंध्या लादलेली फाटकी गोधडी डोक्यावर गाडगे,हातात झाडू असा साधा पेहराव असल्याने लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणत.मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर ‘माझा पांडुरंग चिंध्या पांघरून उभा आहे, असे म्हणतात.ते लहानपणापासूनच धार्मिक व परोपकारी वृत्तीचे होते. तुकारामाचे अभंग त्यांना मुखोद्गत होते.भजनाची प्रचंड आवड असल्याने ते दिवसभर गावाची परिसराची स्वच्छता करत आणि रात्रीच्या वेळी एखाद्या मंदिराजवळ लोकांच्या डोक्यातील बुरसटलेल्या विचारांची स्वच्छता अभंग हातात दोन दगड घेऊन ‘गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला’ अशा कीर्तन प्रवचनातून करत, असा त्यांचा नित्यक्रम. साहित्यसम्राट आचार्य अत्रे म्हणतात,”सिंहाला पाहावे वनात, हत्तीला रानात तसे गाडगेबाबांना कीर्तनात.” समाजप्रबोधनातून नैतिकतेची शिकवण देताना ते म्हणतात, “दोन घास कमी खाईल पण पोरांना शिकवा, दारू पिऊ नका, कर्ज काढू नका, उसनवार करून सण-समारंभ उत्सव साजरा करू नका.नवससायाकरीता बळी देण्यासाठी नाहक मुक्या प्राण्यांची हत्या करू नका.चोरी करू नका, देव, देवश्री आणि भगत यांच्या नादी लागू नका.गोर-गरीब, दीन-दुबळ्यांना आपल्या ताटातील एक तरी घास द्या,असे अनेक चिरंतन अनमोल विचार प्रबोधनातून ते सांगत,श्रोतेही मंत्रमुग्ध होत असत.कीर्तनरुपी सेवेतून स्वच्छता,प्रामाणिकपणा, अंध:श्रद्धा,जातिभेद निर्मूलन आणि पर्यावरणाचं संवर्धन या बाबींचे महत्त्व त्यांनी विशद केले. विदर्भातील आपल्या गावापासून कीर्तन आणि स्वच्छतेची सुरुवात महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,कर्नाटक राज्यातील अनेक गावात ते अहर्निश समाजसेवा करीत राहिले.गाडगेबाबा तीर्थयात्रेला न चुकता जात असत,पण मंदिरात देवदर्शनाला न जाता ते बाहेर थांबून आलेल्या यात्रेकरूंची सेवा करत. तेथील सभोवतीचा परिसर स्वच्छ करून ते कीर्तनात स्वच्छतेचे धडे लोकांना प्रात्यक्षिकासह दाखवत.त्यांचे राहणे,वागणे,खाणे-पिणे अतिशय साधेपणाचे होते.श्रीमंतांनी दिलेले अन्नपदार्थ गोरगरिबांना देत आणि त्यांची चटणी-भाकरी ते स्वतः सेवन करत.जातीविरहित एकसंध समाजनिर्मितीसाठी वेळोवेळी ते कीर्तनातून आवाहन करत. त्याकाळी कर्मकांड, व्यसनाधिनता,पशुबळी व रोगराई यांचे निर्मूलन करण्यासाठी तत्कालिन लोकांना कडाडून विरोध केला.संत गाडगेबाबा हे कर्ते सुधारक होते.तीर्थयात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरुसाठी पुणे, पंढरपूर, आळंदी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी धर्मशाळा आणि मूर्तीजापूर या ठिकाणी गोरक्षण संस्था स्थापन करून तेथे अन्नक्षेत्र उभारले. जे.जे. रुग्णालय, मुंबई येथे आरोग्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी सोय म्हणून धर्मशाळा बांधली. त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाची स्थापना करून नोकरांसाठी नियमावली तयार केली. कुष्ठरोगी, अपंगाची अविरत सेवेसाठी त्यांना समाजाकडूनही निधी मिळाला. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठ्याप्रमाणात लोकोत्तर कार्य केले.लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. त्यांनी विविध संस्थांच्या कार्याचा स्वतः किंवा कुटुंबासाठी उपयोग करून घेतला नाही. अध्यात्माच्या गर्तेत न जाता समाजाला ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ मानवतावाद,भूतदया,स्वच्छता यांची शिकवण दिली.अनेक दैनंदिन विचारांच्या माध्यमातून लोकांना प्रामाणिकपणा,सत्य, कष्ट करण्याचा मोलाचा संदेश दिला.संत तुकाराम महाराज माझे गुरु, पण माझा कुणी शिष्य नाही, असे वेळोवेळी सांगितले.त्यांनी कोठेही आपला मठ किंवा संस्थान तयार केले नाही.कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी गाडगेबाबांना नितांत आदर होता. दोन्ही बाबांचं नातं किती वेगळं होतं एक प्रसंग असा…संत गाडगेबाबा आजारी होते. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते. तत्कालीन कायदामंत्री असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय औपचारिकता बाजूला सारून गाडगेबाबांना भेटण्यासाठी दवाखान्यात आले.दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं.ख्याली खुशाली अन बोलणं झाल्यावर संत गाडगेबाबांनी डॉ.आंबेडकरांना पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक कामासाठी पंढरपूरातील चोखामेळा धर्मशाळेचे दानपत्र आणि धर्मशाळेच्या खात्यात जमलेली १५,०००/- रक्कम डॉ.बाबासाहेबांकडे सुपूर्द करत (१४ जुलै १९५१) गाडगेबाबा म्हणाले, “आपली लई आधीच भेट झाली असती तर धर्मशाळाऐवजी शिक्षण शाळाच काढल्या असत्या. पण आता हे काम तुम्हीच करा, समाजाले अशा लय स्कूलची, कॉलीजाची गरज हाय.” म्हणून या दोन्ही बाबांसमोर आपण सदैव नतमस्तक राहायला हवं..! समाज सुधारणेच्या कार्यात त्यांनी कृतीतून धगधगती ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला. तोही अखेरच्या श्वासापर्यंत, त्यांचे विचार आचारांची दिशा आजच्या तरुणांना निश्चितच आदर्श ठरेल, हे मात्र खरे आहे. संत गाडगेबाबा म्हणजे एक चालते बोलते संस्कारपीठ होते. अशा महान त्यागी संत गाडगेबाबांच्या चरणी कोटी- कोटी प्रणाम !
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड