जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांचा एकाचवेळी राजीनामा
धाराशिव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मध्ये अंतर्गत मतभेद शिगेला पोहोचले आहेत.पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर आणि वरिष्ठ नेते संजय निंबाळकर यांनी एकाच दिवशी पदासह सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. दोन्ही नेत्यांनी आपले राजीनामे थेट प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर सादर केले असून,अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम केले,मात्र काही अडचणींमुळे यापुढे कार्य करणे शक्य नाही, असे दोघांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही नेते नुकतेच बारामती येथे पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन आले होते.त्या भेटीनंतर अवघ्या २४ तासांतच त्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्थानिक स्तरावर गटबाजी आणि नेतृत्वावर असंतोष हेच या निर्णयामागचे कारण असल्याची चर्चा धाराशिव शहरात रंगली आहे.पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजीनामा पत्रातील अंश – मी पक्षाच्या चांगल्या व अडचणीच्या काळात काम केले, परंतु काही कारणांमुळे पुढे पक्षाचे काम करणे शक्य नाही.त्यामुळे मी जिल्हाध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. — संजय दुधगावकर
२०१९ पासून पक्षासाठी काम केले, पण आता वैयक्तिक कारणांमुळे पुढे कार्य शक्य नाही. — संजय निंबाळकर
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य