August 9, 2025

महिला व बाल विकास विभागाला जिल्ह्यात होणारे 4 बाल विवाह रोखण्यात यश

धाराशिव (जिमाका):- जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाला वेगवेगळ्या भागात होणारे 4 बाल विवाह रोखण्यात यश आले आहे. वेगवेगळ्या भागात बाल विवाह होणार आहेत. अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास अधिकारी सुनील अंकुश आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड हेल्प लाईन 1098 व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी यांची टिम संबंधित गावात रवाना झाल्या आणि नियोजित होणारे चारही बाल विवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.
यावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षाचे कर्मचारी रविराज राऊत आणि विकास चव्हाण तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कर्मचारी विभावरी खुणे, प्रज्ञा बनसोडे यांनी तात्काळ संबंधित गावातील ग्रामसेवक सरपंच, अंगणवाडी सेविका आणि पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधून संबंधित बालविवाह हे समुपदेशन करून रोखले. चारही बालविवाह रोखल्यानंतर सर्व बालिकांना बालकल्याण समितीच्या समोर हजर केले असता बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने आणि सदस्यांनी मुलीच्या आई-वडिलांना समज देऊन हमीपत्र लिहून घेत मुलींना परत त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. यावेळी चाईल्ड लाईनचे कर्मचारी अमर भोसले तसेच समुपदेशिका वंदना कांबळे उपस्थित होत्या.
0 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना कसल्याही प्रकारची अडचण व बालविवाह होत असल्यास तसेच शारिरीक व लैंगिक छळ होत असल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील अंकुश यांनी केले.

error: Content is protected !!