कळंब (परमेश्वर खडबडे) – गुळपावडर कारखान्यांनी उसाला अवघे २४०० रुपये प्रति टन दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाल्यानंतरही कारखानदारांनी दिलेला हा अपमानजनक दर मान्य नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हल्लाबोल आंदोलन छेडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विष्णुदास काळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी कळंब तालुक्यातील विविध गुळपावडर कारखान्यांवर धडक देत उसाला ३००० रुपये पहिली उचल देण्याची मागणी करणारी निवेदनं सादर केली. एकुरका येथील जगदंबा मंदिरातून निघालेल्या मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘शेतकऱ्यांचा हक्क मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही!’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. रॅली निपाणी, जागजी,तडवळा,मोहा, खामसवाडी,जवळा या मार्गावरून तुफान शक्तीप्रदर्शन करत पुढे सरकली.प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी ठिय्या देत कारखानदारांना इशारा दिला — “दर ३००० रुपये घोषित करा, अन्यथा तोडणी रोखू!” जयसिंगपूर येथे झालेल्या उस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ३७७१ रुपयांच्या पहिल्या उचलची मागणी केली होती. रिकव्हरी १२ पेक्षा अधिक असतानाही कारखानदारांनी कमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करण्यात आला.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा उसाचेउत्पादन कमी, खर्च जास्त, आणि दर मात्र तोच असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्याने आता कारखानदारांच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड