सभापती राम शिंदे व संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती
डिकसळ (माधवसिंग राजपूत) – गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमित्त रामचंद्र महाराज बोधले संस्थानच्या वतीने डिकसळ येथे ८ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व बोधले महाराज लीलामृत पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावात सुरू आहे. या आठवड्यातील मुख्य आकर्षण म्हणजे ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचे “गुलालाचे कीर्तन” ज्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष भक्तिमय स्वरूप लाभले. ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी कीर्तनातून संत परंपरेचा गौरव करताना सांगितले की, “संत हे उपकार नव्हे, तर कर्तव्य म्हणून समाजसेवा करतात; त्यांचे संपूर्ण जीवन परमेश्वरसेवेसाठी अर्पण असते.” तर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी शेवटपर्यंत लढणार आहे; माझा संघर्ष जातीवादासाठी नसून शिक्षण व न्यायासाठी आहे.” विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वारकरी संप्रदाय हा समाजसंस्काराचा पाया आहे असे सांगत बोधले महाराज संस्थानच्या कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी बोधले संस्थानच्या वतीने परमेश्वर महाराज बोधले, अण्णासाहेब बोधले, रामेश्वर बोधले, मुख्याध्यापिका बोधले मॅडम व सरपंच पुष्पा धाकतोडे यांनी मान्यवरांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. कार्यक्रमात धनंजय देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. अखेर गुलाल,फुले,आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर शिवसेना नेते अजित (दादा) पिंगळे, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, भाजप तालुकाध्यक्ष दत्ता साळुंखे, संभाजी ब्रिगेड मराठवाडा संघटक अतुल भैय्या गायकवाड, अशोक चोंदे, सरपंच पुष्पा धाकतोडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थानच्या विकासकामांसाठी निवेदन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना देण्यात आले. सप्ताहातील कीर्तन सेवेत समाधान महाराज शर्मा (केज), भागवत महाराज बदाडे (माजलगाव),ज्ञानेश्वर महाराज पठाडे (कर्जत),निवृत्ती महाराज देशमुख (इंदौरीकर),उमेश महाराज दशरथे,सोसेवा महाराज सानप आणि जयवंत बोधले महाराज यांनी कीर्तन सेवा केली. समाप्तीच्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९.३० दरम्यान डिकसळ परिसरातील ११ गावांच्या वारकऱ्यांचा सहभाग असलेली दिंडी श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराजांच्या पादुकांसह रथातून प्रदक्षिणा करणार आहे. यानंतर सकाळी १०.३० ते १२.३० ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांचे काल्याचे कीर्तन, “श्री गुरू रामचंद्र बोधले महाराज सेवा पुरस्कार” वितरण व महाप्रसादाने सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन