कळंब – वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नाही तर समाजसेवेची एक पवित्र साधना आहे.या सेवाभावी भावनेतून कार्यरत असलेल्या कळंब तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली.पुढील दोन वर्षांसाठी समाजाच्या आरोग्यसेवेचा ध्यास घेऊन नवे पदाधिकारी जबाबदारी स्वीकारत आहेत. या कार्यकारिणीत डॉ.श्याम चौधरी अध्यक्ष,डॉ.शेख मॅडम उपाध्यक्ष, डॉ.सुशील अडसूळ सचिव तर डॉ. संजीत पाखरे कोषाध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. “सेवा हीच खरी साधना” या भावनेने नवी टीम पुढे सरसावली असून,नागरिकांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. मावळते अध्यक्ष डॉ.राजेंद्र गोरे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यांच्या कार्यकाळात कोरोना काळातील आव्हानांचा सामना करत संघटनेने शासकीय आयटीआय कळंब येथील कोविड केंद्रावर दिलेली निस्वार्थ सेवा आजही लोकांच्या स्मरणात आहे. याचबरोबर वृक्ष लागवड,‘बेटी बचाव – बेटी पढाव’ जनजागृती, स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध यांसारख्या सामाजिक उपक्रमांमध्येही संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजची नवी कार्यकारिणी केवळ आरोग्यसेवाच नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठीही तत्पर आहे.वैद्यकीय क्षेत्रातील स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणे, शासकीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबवणे आणि सामाजिक उपक्रमांना चालना देणे या दृष्टीने या कार्यकारिणीकडून सकारात्मक पावले उचलली जातील,अशी अपेक्षा नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजाला बळ देणे आणि “निरोगी समाज, सशक्त राष्ट्र” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणे हा नव्या कार्यकारिणीचा संकल्प आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन