कळंब – कळंब शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगरपरिषदेकडून घरकुलांचे वाटप करण्यात येत आहे.या योजनेचा उद्देश गरीब व उपेक्षित घटकांना घर बांधणीसाठी मदत करून स्वतःचे घर उपलब्ध करून देणे हा आहे.मात्र,या योजनेतच बोगस घरकुल वाटप झाल्याची चर्चा सध्या जोर धरत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,काही लाभार्थ्यांकडे आधीपासूनच आर.सी.सी.बांधकाम असलेली घरे आहेत.एवढेच नव्हे तर दोन मजली घरे असणाऱ्यांनादेखील या योजनेचा लाभ मिळाल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे खर्या गरीब व बेघरांना घरकुलाचा लाभ न मिळता सक्षम लोकांच्या खिशात तो जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात तक्रारदार खादीम सय्यद यांनी एप्रिल महिन्यातच नगरपरिषदेकडे तक्रार दाखल केली होती.मात्र,अद्याप त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.सय्यद यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले,परंतु त्यांना भेट घेता आली नाही.उलट प्रशासन कारवाई करण्याऐवजी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नगरपरिषदेकडून कारवाई होत नसल्याने सय्यद यांनी पुराव्यासहित जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहिती दिली.याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.जर नगरपरिषदेकडून झालेल्या सर्व घरकुल वाटपांची चौकशी झाली, तर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे.” तसेच,त्यांनी पुढे इशारा दिला की, “संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करण्याचा मार्ग अवलंबू.” या प्रकरणामुळे नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी सर्व अर्जांची पुनर्पडताळणी करून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड